सातारा जिल्हा बॅंकेच्या सत्ताधारी सर्वपक्षीय पॅनेलच्या अनुषंगाने मंगळवारी (दि १०) उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अनुषंगाने साताऱ्यात आज (सोमवार)प्रमुख नेत्यांची बैठक झाली. आपल्याला या पॅनेलमध्ये घ्यावे या मागणीवर ठाम रहात खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटणमध्ये जाऊन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्यासह तीन जागा बिनविरोध झाल्या असून १८ जागांसाठी १४१ उमेदवार रिंगणात आहेत.

मागील सर्व मतभेद विसरुन उदयनराजेंनी प्रमुखांची भेट घेत घेतली. त्याचप्रमाणे आज साताऱ्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालक मंत्री बाळासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील आदींची बैठक झाली. बैठकीत उदयनराजेंच्या व इतरांच्या उमेदवारीबाबत कोणतेही ठोस निर्णय झाला नाही. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उदयनराजे यांना उमेदवारी न देण्याबाबत ठाम आहेत, त्यामुळे त्यांचे मत विचारात घेतल्याशिवाय याबाबतचा निर्णय होणार नाही.

उदयनराजेंनी फलटण भेटीत रामराजेंशी दीड ते दोन तास चर्चा केली. यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि गृहनिर्माण व दुग्ध संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले दिलीपसिंह भोसले यांचीही भेट घेतली. बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. मंगळवारी (दि १०) उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अनुषंगाने आज प्रमुख नेत्यांची बैठकित कोणताही निष्कर्ष निघाला नाही. शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील हे आपल्या उमेदवार मागण्यांवर ठाम आहेत.

शिवेंद्रसिंहराजेंकडून उदयनराजेंना होणारा विरोध आणि पाच जागांची मागणी यावरच सध्या चर्चेचा खल सुरु आहे.
मकरंद पाटील यांनी एक अधिकची अनुसूचित जातीजमाती गटाची जागा मागितली आहे. अखेरच्या दिवशी सत्ताधारी पॅनेलची अंतिम यादी निश्चित करणे, जास्तीत उमेदवारी अर्ज माघारी घेणे, अंतिम यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंजूर करणे यावर चर्चा झाली.

एकूणच प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने इच्छुक उमेदवार गॅसवर आहेत. तर, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता पडताळून पाहून कठोर निर्णय घ्यावा लागला तरी निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता ही पडताळून पाहण्यात आली. मंगळवारी सकाळी आपापले उमेदवार हजर करून यादी अंतिम झाली व त्याला शरद पवार व अजित पवारांची मान्यता मिळताच अर्ज माघारीच्या प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले.