वाई : सातारा जिल्हा बँक आणि नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे,  तसतसे साताऱ्यातील दोन्ही राजांमधील वाक्युद्ध देखील रंगू लागले आहे. सध्या या दोन राजांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमासाठी कसे जायचे यावरून शाब्दिक वाद रंगला आहे.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून जात विविध विकासकामांचे उद्घाटन केले. त्यांच्या या दुचाकी प्रवासावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीका केली. त्यावर उत्तर देताना उदयनराजे यांनी लगोलग प्रतिहल्ला चढवत, ‘मी दुचाकीवरून गेलो. मी चालतही जाईन, रांगत जाईन, वाटले तर लोळतही; सीट वर उभा राहून जाईन नाहीतर डोक्यावर चालत जाईन, तुम्हाला काय करायचेय?’ अशा भाषेत उत्तर दिल्याने राजांमधील हा वाद आणखी वाढला. त्यांच्या या प्रतिउत्तरावर शिवेंद्रसिंहराजे यांनी आज पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, ‘तुम्हाला जसे जायचे तसे जा,पण फक्त मुद्द्यांचं बोला. तुम्ही सातारा पालिकेला लोळवण्याचा  प्रयत्न करू नका!’

सातारा जिल्हा बँक आणि पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन भावांमध्ये पुन्हा एकदा वाक्युद्ध तापू लागले आहे.