सातारा : मोबाईलचा वापर, टीव्ही पाहणे आणि उद्धट वर्तनावरून झालेल्या कौटुंबिक वादातून एका शिक्षक पित्याने रागाच्या भरात १७ वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी बॅटने प्रहार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील गोडोली परिसरातील स्वराज्यनगर येथे उघडकीस आली आहे. आर्या पुरुषोत्तम कदम (वय १७) असे मृत मुलीचे नाव असून, या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आरोपी पिता पुरुषोत्तम संपत कदम याला अटक केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे चंचळी (ता. कोरेगाव) येथील रहिवासी असलेले पुरुषोत्तम कदम व त्यांची पत्नी शीला हे दोघेही व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांच्या १७ वर्षीय मृत मुलीला चुकीच्या संगतीमुळे उद्धट वर्तनाची सवय लागली होती. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी पालकांनी तिचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन व वैद्यकीय उपचारही सुरू केले होते. मात्र, मुलीच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. मे महिन्यातही तिने वडिलांना मारहाण करून जखमी केले होते.

​शनिवारी रात्री टीव्ही बंद करणे आणि मोबाईल वापरावरून घरात पुन्हा वाद पेटला. रागाच्या भरात मुलीने लहान बहिणीला मारहाण केली. त्यानंतर ती बॅट घेऊन वडिलांच्या अंगावर धावून गेली. या वेळी संतप्त झालेल्या पुरुषोत्तम यांनी तिच्या हातातील बॅट हिसकावून थेट तिच्या डोक्यात मारली. वर्मी बसलेल्या प्रहारामुळे मुलगी जागीच कोसळली.

​पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

​घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांना तातडीने माहिती न देता, रविवारी सकाळी मुलगी बेशुद्ध असल्याचे भासवले. तसेच रक्ताचे डाग पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि फॉरेन्सिक पथकाच्या तपासातून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आई-वडिलांची कसून चौकशी केली असता, अखेर रविवारी रात्री आरोपी पित्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.