सातारा : अंबवडे संमत कोरेगावच्या हद्दीत धोम धरणाच्या डाव्या कालव्यावरील पाणी सोडण्याच्या दरवाजाची साखळी आणि कुलूप अज्ञातांनी तोडून कालव्यातील पाणी वांगणा नदीत सोडले. त्यामुळे वांगणा सिंचन योजना बंद पडल्या व डाव्या कालव्याचे आवर्तन विस्कळीत झाले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अंबवडे संमत कोरेगावच्या हद्दीमध्ये धोम डावा कालवा साखळी क्रमांक ५१/००० येथे कोणीतरी अज्ञात इसमाने कशाच्या तरी साहाय्याने पाणी सोडण्याच्या दरवाजाची (अतिवाहक दार) साखळी आणि कुलूप तोडून कालव्यातील पाणी वांगणा नदीत सोडल्याने कालव्यावरील वांगणा सिंचन योजना बंद पडल्या व डाव्या कालव्याचे आवर्तन विस्कळीत झाले. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे, तसेच सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.
याप्रकरणी धोम पाटबंधारे विभागाच्या सातारा रोड शाखा (ता. कोरेगाव) कार्यालयाचे मोजणीदार (बीटधारक) रोहित शिवाजी बोडके (वय ३६, रा. कोंडवे, ता. जि. सातारा) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार देवकी घाडगे करत आहेत.
दरम्यान, पाणी नदीत सोडल्याचे समजताच धोम पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत दरवाजाला नवीन साखळी व कुलूप लावल्याने पाण्याचा प्रवाह थांबला, तसेच पुढे कोरेगाव, रहिमतपूर या कालव्याच्या अखेरच्या भागापर्यंत पाणी सुरळीत सुरू झाले.
कारवाईची मागणी
या प्रकारामुळे कालव्यावरील वांगणा सिंचन योजना बंद पडल्या. तद्वतच या डाव्या कालव्याचे अंबवडेपासून पुढे कोरेगाव, रहिमतपूर या कालव्याच्या अखेरच्या भागापर्यंत पाण्याचे आवर्तन विस्कळीत झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी केली आहे.
