कराड : गणेशोत्सव आनंदाचा सण असल्याने आवाजाच्या मर्यादा पाळाव्याच लागतील. त्याचे उल्लंघन केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील २९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर खटले भरले असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. जे कोणी कायद्याचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
कराडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलारी यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत बंदोबस्ताचा आढावा घेतला. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, के. एन. पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना फुलारी म्हणाले, की उत्सवकाळात गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके तैनात आहेत. गणेश विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनचीही नजर राहणार असून, तशी व्यवस्था करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर सायबर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात आले आहे. समाजात तेढ निर्माण करणारे भाष्य कोणाकडूनही होता कामा नये. ग्रामीण भागातील मंडळांनी गणेश विसर्जनासाठी गणेशमूर्ती शहरात घेऊन येऊ नये. आपल्या भागातच मूर्तींचे विसर्जन करावे, तसेच सार्वजनिक मंडळांनी वेळेचे काटेकोर पालन करून देखावे सादर करावेत. कायद्याच्या चौकटीत आवाजाची मर्यादा पाळावी, असे आवाहन फुलारी यांनी या वेळी केले.