सातारा : सुरूर ते वाई आणि मांढरदेव ते वाई रस्त्याच्या कामात मनमानी आणि दिरंगाई करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खासदार आणि सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी कामकाजाबद्दल फैलावर घेतले.
वाई, सुरूर रस्त्याचे काम करत असताना ठेकेदाराने सुरूरपासून वाईपर्यंत संपूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे. काम करताना स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांशी समन्वय न करता मन मानेल त्या पद्धतीने काही झाडे तोडली. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ, वाईकर नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागले. त्याची दखल घेत त्या संपूर्ण रस्त्याची पाहणी करून खासदार पाटील यांनी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
या मार्गावरून दररोज हजारो पर्यटक महाबळेश्वरला जा-ये करत असतात. या परिसरातील ग्रामस्थांना त्यांच्या दैनंदिन कामानिमित्ताने दररोज वाई येथे यावे लागते. अनेक वाईकर नागरिक दररोज नोकरी व कामधंद्यानिमित्त पुणे येथे जात असतात. खंडाळा, लोणंद, शिरवळ येथील नागरिक वाईला येत असतात. या सर्वांना त्रास होईल असे काम ठेकेदाराने केले आहे. संपूर्ण रस्ता एकाच वेळी खोदून ठेवला आहे. त्यामुळे खासदार पाटील यांनी संताप व्यक्त केला.
या कामात जर टप्पे पाडले असते किंवा एक मार्गिका दुरुस्त करून मग दुसरी दुरुस्त करायला हवी होती. काम सुरू करताना ठेकेदाराने स्थानिक प्रशासनाशीही संपर्क ठेवला नाही. मन मानेल त्या पद्धतीने काम केल्याने सगळा रस्ता चिखलमय झाला आहे. रस्त्यावरून वाहने चालवताना वाहन चालकाला त्रास होत आहे. दुचाकीही या रस्त्यावर चालूही शकत नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बाजार समिती संचालक रवींद्र मांढरे, नगरसेवक चरण गायकवाड, नाना चिकणे परिसरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.