सातारा: स्वास्थ्य प्रमाणपत्राच्या (फिटनेस सर्टिफिकेट) वादातून राजकीय दबाव, दमदाटी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून डॉ. राजेंद्र रुपनवर (रा. फडतरी, ता. माळशिरस) यांनी मुंबई येथे केलेल्या आत्महत्येचे मंगळवारी फलटणमध्ये तीव्र पडसाद उमटले. डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्व प्रशासकीय अधिकारी व राजकीय व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी माळशिरस तालुक्यातील ग्रामस्थांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन केले.
प्रकरणाची पार्श्वभूमी
२८ जुलै रोजी एका माजी आरोग्य मंत्र्यांच्या कथित स्वीय सहायकाने स्वास्थ्य प्रमाणपत्रासाठी ( फिटनेस सर्टिफिकेट) व वैद्यकीय अधीक्षकांच्या नंबरवरून डॉ. रुपनवर यांच्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी तक्रार करूनही वरिष्ठांनी डॉ. रुपनवर यांच्यावरच वेतनवाढ रोखण्याची अन्यायकारक कारवाई केली. या अन्यायाविरुद्ध त्यांनी समाज माध्यमांवर चित्रफीत व हातावर संशयितांची नावे लिहून न्यायाची मागणी केली होती. एक महिन्याअखेर न्याय न मिळाल्याने त्यांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईतील सायन येथे रेल्वेच्या उच्च दाबाच्या टॉवरवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.
रुग्णालयासमोर तणाव आणि संतप्त प्रतिक्रिया
या घटनेची माहिती मिळताच संतप्त नातलगांनी आणि ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर ठिय्या मांडला. पोलिसांनी आंदोलकांना आत जाण्यापासून अटकाव केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, सावलीत शांततेत बसण्याचे सांगत आंदोलकांनी रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. फलटण उपजिल्हा रुग्णालयात दहा महिन्यांपूर्वीच येथील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने अशाच त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर डॉ. रुपनवर यांचे प्राण वाचले असते. आता वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असल्याची संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली. या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
