सातारा : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या दाम्पत्यास साताऱ्यातील वडूज पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. प्रतीक्षा (२२) आणि गणेश संजय घाडगे (वय ३०) असे या दाम्पत्याचे नाव असून, ते सातारा जिल्ह्यातील निमसोड (ता. खटाव) येथील रहिवासी आहेत. पनवेलमधील भाजपचे माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी २ सप्टेंबर रोजी पनवेल तहसीलदारांकडे ‘लाडकी बहीण’ योजनेमध्ये गैरकारभार झाल्याची तक्रार दिली होती. खारघरमधील एका महिलेचे आधार कार्ड वापरून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच साताऱ्यात एकाच महिलेने ३० अर्ज भरले असून, यातील काही खात्यांमध्ये पैसेही जमा झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

हेही वाचा >>> सांगली: सुधीर गाडगीळ यांची निवडणुकीतून माघार, कार्यकर्त्यांकडून फेरविचाराची मागणी

सातारा जिल्हा प्रशासनाने चौकशी केल्यावर या दाम्पत्याचे नाव समोर आले. बारावी शिक्षण घेतलेला गणेश घाडगे हा भिवंडी येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याची पत्नी प्रतीक्षा घाडगे हिने माहेरच्या नावे असलेल्या प्रतीक्षा पोपट जाधव या आधार कार्डचा वापर करत पहिल्यांदा जादाचा अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी अन्य ओळखीचे, नातेवाईक असलेल्या महिलांच्या आधार कार्डचा वापर करत अर्ज दाखल केले होते. या एकूण तीस अर्जांपैकी प्रतीक्षाच्या नावे दिलेल्या बँक खात्यावर २९ ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये जमा झाले आहेत. हा प्रकार लक्षात येताच सातारा जिल्हा प्रशासनाने चौकशी केल्यावर या दाम्पत्याचे हे कृत्य समोर आले आहे. या घटनेबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी एस. एस. खाबडे यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या दाम्पत्यास मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. पाेलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील अधिक तपास करीत आहेत.