राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. यानंतर आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दीड वर्षापूर्वी दाखल झालेल्या प्रकरणात सातारा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला आहे. सातारा पोलीस ऑर्थर रोड तुरुंगातून सदावर्तेंना ताब्यात घेऊन साताराकडे रवाना झाले आहेत.

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी दीड वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झालाय. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ऑर्थर रोड तुरुंगातून ताबा घेतला आहे. सध्या गुणरत्न सदावर्ते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत आहेत. या प्रकरणात त्यांना आधी चार दिवसांची पोलीस कोठडी आणि नंतर आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

सदावर्तेंना नेमकं कोणतं वक्तव्य भोवलं?

गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. साताऱ्यात राजेंद्र निकम यांनी सदावर्तेंच्या या वक्तव्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यावरूनच ऑक्टोबर २०२० मध्ये सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा : शरद पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी पुण्यातून एका पत्रकाराला अटक; चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आलं

या प्रकरणी सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी वारंवार चौकशीला बोलावून ते गैरहजर राहिले. त्यामुळे सातार पोलिसांनी आता गिरगाव न्यायालयात सदावर्तेंच्या चौकशीसाठी ताब्याची मागणी केली होती. यावर न्यायालयाने सातारा पोलिसांना १७ एप्रिलपर्यंत सदावर्तेंचा ताबा दिलाय.