सातारा : पुणे-बंगळूरु महामार्गावरचा प्रमुख जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, शेती आणि आता नव्याने औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख निर्माण होत आहे.
जिल्ह्याचा काही भाग भीमा आणि मोठा भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात मोडतो. सह्याद्रीची पर्वत श्रेणी, डोंगरदऱ्या चढउतारांची जमीन आणि सपाटीचे क्षेत्र असे जिल्ह्याचे सर्वसाधारण स्वरूप आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस तर पूर्व भागात दुष्काळ असा प्रदेश आहे. नुकत्याच झालेल्या वळिवाच्या पावसाने या दुष्काळी परिसरात वर्षभर पुरेल इतके पाणी आहे.
जिल्ह्यात विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करून गुंतवणूक व औद्योगिक गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. थेट विदेशी गुंतवणूक आणि मोठे व लघु व निर्यातक्षम उद्योगही जिल्ह्यात येत आहेत. पुणे-बंगळूरु महामार्गाला पर्यायी महामार्ग म्हणून मुंबई बंगळूर औद्योगिक महामार्ग (इंडस्ट्रियल कॉरिडॉर) खंडाळा, फलटण आणि माण या दुष्काळी तालुक्यातून जात आहे. या मार्गावर म्हसवड, मासाळवाडी व धुळदेव (ता माण) येथे साडेआठ हजार एकरवर नवीन औद्योगिक शहर वसविण्यात येत आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यात वैद्यकीय, पशुवैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. रयत आणि कृष्णा ही स्वतंत्र अभिमत विद्यापीठे आहेत. स्पर्धेत टिकाव धरलेली पाचगणी येथील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांची संस्कृती हे जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. येथे जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद आणि खासगी मराठी शाळांमध्येही मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थांसाठी या शाळांमध्ये ‘एआय’ सह नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत.
शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर
जिल्ह्यात फळाचे, मधाचे, पुस्तकांचे गाव ही नवी संकल्पना रुजली आहे. शेतीमध्येही ‘एआय’पासून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांतून इथेनॉल, स्पिरिट, मद्यार्क निर्मिती होते आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘स्टॅंड अप इंडिया’, ‘युनिकॉर्न’चा फायदा सातारकरांनी उचलला आहे. साताऱ्यातील हे उद्योगविश्व झपाट्याने विकसित आणि विस्तारत असल्याने लघुउद्योगांची साखळी तयार झाली आहे. यासाठी रोजगाराची मोठी संधी निर्माण होत असताना कुशल मनुष्यबळही उपलब्ध होत आहे.
नवीन महाबळेश्वर पर्यटनस्थळ
पाचगणी, महाबळेश्वर ही जागतिक पर्यटन स्थळे, जैवविविधतेचा ठसा उमटवणारे कास पठार, कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या शिवसागर जलाशयाचा समावेश करून चार तालुक्यांतील २९५ गावांचे ‘नवीन महाबळेश्वर’ हे पर्यटन स्थळ उभारले जात आहे. मुनावळे (ता. जावली) येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून हा जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
जिल्हा बँक अग्रेसर
सातारा जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत, सहकारी, व्यापारी, खासगी बँकांचे जाळे जिल्हाभर पसरलेले आहे. सातारा जिल्हा बँकेचा कृषी औद्योगिक क्षेत्रातील पतपुरवठ्यात प्रथम क्रमांक आहे. या जिल्हा बँकेला नाबार्डचे देशपातळीवरील उत्कृष्ट बँकिंग व्यवस्थेचे प्रथम क्रमांकाचे सलग सात पुरस्कार मिळले आहेत.
प्रसिद्ध कूपर उद्योगसमूहाचे अध्यक्ष फारूख कूपर या भरारीबद्दल म्हणतात, की आम्ही साताऱ्यामध्ये उद्योग उभा केला तेव्हा रस्ता, टेलिफोन, वीज मूलभूत सुविधाही नव्हत्या. आता या पायाभूत सुविधांमध्ये सातारा अग्रेसर आहे. त्यामुळे उद्योगवाढीला चालना मिळत आहे.
जिल्ह्यात गुंतवणूक येण्यासाठी सध्या अतिशय पोषक वातावरण आहे. इलेक्ट्रॉनिक वाहने, सौरऊर्जा तसेच पर्यायी ऊर्जा यांसारख्या क्षेत्रातही उद्योग येत आहेत. उद्योगांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधाही असल्याने देशी-परदेशी कंपन्यांकडून जागेची मागणी होत आहे. -संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा
दृष्टिक्षेपात : सातारा जिल्हा
क्षेत्रफळ – ११२१.९६० चौरस किमी
लोकसंख्या – ३०,०३,७४१ लक्ष
वैद्यकीय महाविद्यालये – २
पशुवैद्यकीय महाविद्यालये – २
अभियांत्रिकी महाविद्यालये – ९
औद्योगिक वसाहती – १३
विशेष आर्थिक क्षेत्र – २
मोठे उद्योग – ६८; गुंतवणूक – १८५०.१ कोटी
रोजगार – बारा लाख
लघुउद्योग -३८८९ ; गुंतवणूक ५४६९५.४४ लाख
परदेशी गुंतवणूक प्रकल्प – २३ ; गुंतवणूक ८३५०.५३ कोटी
साखर कारखाने – १८; सूत गिरण्या – ६