वाई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गुरुवारी सायंकाळी महाबळेश्वरमध्ये पोहोचला आहे. दाट धुके आणि भन्नाट पावसाळी वातावरणामुळे महाबळेश्वरला सध्या निसर्ग खुलला आहे. त्याचा आनंदही सलमान घेत आहे.

महाबळेश्वरला पोहोचलेल्या सलमानचा मुक्काम मात्र डिएचएफएल घोटाळ्यातील आरोपी व सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या वाधवानच्या बंगल्यात आहे. त्याने वाधवानच्या बंगल्यात वास्तव्य केल्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्यात. त्यामुळे सलमानने वास्तव्यासाठी हाच बंगला का निवडला हाही एक प्रश्नच आहे.

हेही वाचा – भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार, लक्ष्मण हाकेंनी मांडल्या तीन प्रमुख मागण्या

घरावरील गोळीबार, धमकी या सगळ्या प्रकारामुळे अभिनेता सलमान खान मागील काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्यातच आता महाबळेश्वर पोहोचला आहे. गोळीबार व धमकी प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सलमानची भेट झाली होती. त्यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात आणि चित्रपटसृष्टीत होत होती. सलमानने साताऱ्यातील महाबळेश्वर येथे आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी व घरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दाट धुक्यामुळे तो मुख्यमंत्र्यांच्या गावी पोहोचू शकला नाही. तो मुख्यमंत्र्यांच्या गावी कशासाठी जात होता हेही समजले नाही. त्याच्यावरील गोळीबार प्रकरणानंतर त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पोलीस संरक्षणात व त्याच्या मोठ्या महागड्या दहा-बारा गाड्यांच्या ताफ्यात सलमान महाबळेश्वर येथे आला आहे.

सलमानवर झालेल्या गोळीबारानंतर व मिळालेल्या धमकीमुळे त्याला खास पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. पोलिसांचाही ताफा त्याच्या गाड्यांच्या ताफ्यासोबत आहे. विशेष म्हणजे सलमान खान हा महाबळेश्वरातील वाधवानच्या बंगल्यात रात्री वास्तव्यास आहे. डीएचएफएलमधील घोटाळ्यानंतर वधवान बंधू चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या महागड्या गाड्या पाचगणी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्या आजही पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या आहेत. करोना काळात वाधवान हे नाव बरंच चर्चेत आलं होतं.

हेही वाचा – ‘बिनशर्ट’च्या वक्तव्यावर अमित ठाकरेंचं काका उद्धव ठाकरेंना उत्तर, “राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने ज्यांचा मुलगा..”

सलमान खान महाबळेश्वरमध्ये, मुख्यमंत्री शिंदे यांच्या गावी जाताना धुक्याने वाट अडवली. वाधवान यांच्या बंगल्यात वास्तव्य करावे लागले. वधवान बंधूंची महाबळेश्वर येथे मोठी जागा आणि दोन-तीन बंगले आहेत. त्यातील एक बंगला ईडीने जप्त केला आहे. इतर बंगल्यातील महागडी पेंटिंग व फर्निचर जप्त केले आहे.

सलमान खानचे कोणत्या हॉटेलमध्ये की बंगल्यामध्ये, रिसॉर्टमध्ये चित्रीकरण आहे, हे समजले नाही. त्याचा किती दिवस मुक्काम आहे तेही समजले नाही. त्याचा मुक्काम असलेल्या बंगल्याचे गेट बंद आहे. तेथे पोलीस संरक्षण आहे आणि बंगल्याच्या आतमध्ये गाड्यांचा ताफा उभा आहे. त्यामुळे याबाबत जास्त माहिती मिळू शकली नाही.