सातारा: सातारा शहरातील एका नामांकित विद्यालयात गुरुवारी सकाळी स्विमिंग पूलच्या देखभालीसाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन वायूच्या सिलेंडरमधून गळती झाल्याने काही काळ गोंधळ आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. वायूच्या तीव्र वासामुळे काही विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवला. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविले. मात्र, त्रास झालेल्या तीन विद्यार्थिनींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या स्विमिंग पूलसाठी असलेल्या क्लोरीन पुरवठा यंत्रणेमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. यामुळे काही मिनिटांतच परिसरात क्लोरीनचा उग्र वास पसरला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शाळा प्रशासनाने तत्काळ वर्ग रिकामे करत सर्व विद्यार्थ्यांना मैदानावर आणि सुरक्षित ठिकाणी हलवले. वायूच्या तीव्रतेमुळे काही शिक्षकांनाही अस्वस्थता जाणवली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी संरक्षणात्मक उपकरणांचा वापर करून अवघ्या काही वेळात गळती रोखली.

घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेत धाव घेतली. आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असतानाही शाळेत रुग्णवाहिका किंवा वाहनांची तत्काळ उपलब्धता नसल्याबद्दल पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या विद्यार्थिनींना रिक्षातून रुग्णालयात न्यावे लागल्याचा आरोप करत पालकांनी शाळा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था आणि धोकादायक रसायनांच्या साठवणुकीच्या पद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

‘क्लोरीन गळती अत्यंत अल्प प्रमाणात होती आणि ती तात्काळ नियंत्रणात आणण्यात आली. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. रुग्णालयात दाखल तिन्ही विद्यार्थिनींची प्रकृती उत्तम आहे. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये,’ असे आवाहन शाळा व्यवस्थापनाने केले आहे.