सातारा: श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाला. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यासोबत झालेला २०२२ सालचा करार रद्द करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसेच श्रीराम कारखाना सहकारी अथवा खासगी कारखान्यास सहयोगी तत्वावर चालविण्यास देण्याचा ठराव मांडण्यात आल्याने सभासद आणि विरोधक आक्रमक झाले. संचालक मंडळाकडून सभा गुंडाळण्याचा प्रयत्न दिसून आल्याने सभासदांचा संताप अनावर झाला. यामुळे सभेत गोंधळ उडाला. या वेळी फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर आणि श्रीराम कारखान्याचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यामध्ये खडाजंगी झाली. या गोंधळात रामराजे नाईक निंबाळकर सभा सोडून निघून गेले.
कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्या बरोबरचा भागीदारी करार रद्द करणे आणि नव्याने आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यांची विशेष सर्वसाधारण सभा आज सोमवारी (दि १८) आयोजित करण्यात आली होती.
सभेत फलटण पालिकेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. कारखान्याच्या कारभारावर जोरदार टीका केली. संचालक मंडळाची बैठक न घेता असा निर्णय कसा घेतला असा सवाल माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी उपस्थित करत संभाव्य नुकसानीस जबाबदार कोण असा जाब विचारला.
फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी नफा-तोटा पत्रक सभासदांसमोर मांडत कारखान्यामुळे सभासदांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केला. तर शेतकरी संघटनेचे धनंजय महामुलकर आणि नितीन यादव यांनी प्रति टन २०० रुपये मागील फरकाचे कोण देणार अशी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.दरम्यान, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या उत्तरांवर विरोधक समाधानकारक नसल्याचे स्पष्ट दिसून आले.
सभेला विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अध्यक्ष डॉ बाळासाहेब शेंडे, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सत्यजीतराजे नाईक-निंबाळकर, नगरसेवक अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह संचालक मंडळ, सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समशेरसिंह-संजीवराजेंमध्ये खडाजंगी
सभेत विरोधकांनी प्रश्नांचा भडिमार सुरू केल्यानंतर संचालक मंडळाने सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी सभासदांचे म्हणणे ऐकून घेण्याची मागणी करत संजीवराजे यांना थेट प्रश्न विचारले. यावेळी संजीवराजे स्टेजवरून खाली उतरून समशेरसिंह यांच्या जवळ आले आणि दोघांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
