सातारा : शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्यामुळे साहित्य संमेलनाचा मान साताऱ्याला मिळाला आहे. हे संमेलन सर्व ताकदीने यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी माझ्याकडून सहकार्य राहील, असे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.मुंबई येथे भारत गौरव ट्रेनच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले मुंबईला रवाना झाले. याच दरम्यान, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

उदयनराजे म्हणाले, की साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. साहित्य मेळा भरण्यासाठी आणि तो यशस्वी करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे. यामध्ये सातारा लोकसभेचा खासदार म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही. साहित्य उत्सवाचा महामेळा भरवणे हे एका कोणाचे काम नाही. हा जगन्नाथाचा रथ आहे. हा रथ आपण सातारकर म्हणून एकत्रितपणे पुढे नेऊया. यामध्ये मी कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही उदयनराजे यांनी दिली.

सातारा जिल्ह्याच्या साहित्य परंपरेला अनेक दिग्गजांनी समृद्ध केलेले आहे. या समृद्धीला एक वेगळी किनार आहे. सातारा जिल्ह्याचा ग्रंथ महोत्सव दरवर्षी साहित्य परंपरांचा मेळावा भरवत असतो, त्याचा कळसाध्याय हा साहित्य संमेलनाच्या रूपाने साकार होत आहे. यामध्ये सर्व सातारकरांनी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आपापली जबाबदारी निश्चितपणे पार पाडावी, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साहित्य महामंडळाच्या स्थळ समितीने साताऱ्यात भेट घेतली. साहित्य संमेलन साताऱ्यात घेण्याविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अखिल भारतीय साहित्यमंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच साताऱ्याला संमेलनाचे आज यजमानपद मिळाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा यांनी तब्बल बारा वर्षे साहित्य संमेलनाची मागणी केली होती. त्या मागणीचा मान राखून साहित्य संमेलनाचे नियोजन साताऱ्याकडे आले आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा संमेलनाला संपूर्ण सहकार्याची भूमिका घेत संमेलनाच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या असून साहित्य संमेलनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वतोपरी सहकार्य – उंडाळकर

ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनीही या संमेलनास सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, कराड येथे माजी आमदार विलासकाका उंडाळकर पाटील यांनी २००३ च्या कालावधीत एक संमेलन घेतले होते. त्या संमेलनास तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आले होते. ते संमेलन ताकदीने यशस्वी केले होते. आता साताऱ्यात होणारे साहित्य संमेलन हे जिल्ह्याचे भूषण आहे. त्यामुळे या संमेलनास माझे सर्वतोपरी सहकार्य राहणार आहे.