सातारा: सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह कण्हेरीच्या डोंगरावर ढगफुटीसदृश पावसामुळे ओढ्यांना पूर आला. तासभर झालेल्या पावसाने वीटभट्टीमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अतीट येथे वीज पडून एका गाईचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नागठाणे (ता. सातारा) येथे वीज पडून तुकाराम होनमाने (मूळ रा. गोरडवाडी. ता. माळशिरस, जि. सोलापूर) या मेंढपाळाचा मृत्यू झाला. नागठाणे पेट्रोलपंप परिसरात मेंढ्या चरायला सोडल्या असताना ही घटना घडली.

शिंदेवाडी (ता. खंडाळा) उत्रौली येथे दुचाकीवर वीज कोसळून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. जोरदार वारे आणि पावसामुळे वाई शहर व परिसरातील काही भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

वाई, खंडाळा शहरासह परिसरात शुक्रवारी अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी विजांचा लखलखाट पाहायला मिळाला.

शुक्रवारी या परिसरात नागरिकांना उकाडा असह्य झाला होता. अकरा वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात झाली. तर, दुपारी दीड वाजता पावसाला सुरुवात झाली. मांढरदेव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह कण्हेरी गावच्या डोंगरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगरमाथ्यावरून नाले खळाळू लागले. त्यामुळे काही मिनिटांतच ओढे दुथडी भरून वाहू लागले . अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. कण्हेरी परिसरातील वीटभट्टीवर तयार केलेल्या कच्च्या विटांवरील झाकलेले कागद वादळी वाऱ्याने उडून गेल्याने तयार विटा भिजून सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, अतीट येथे गोठ्याजवळ बांधलेल्या गाईवर वीज पडून ती जागीच ठार झाली. यामध्ये रामदास राजाराम जाधव यांचे मोठे नुकसान झाले . खंडाळा येथील असवली, कण्हेरी, लोहोम व परिसरात पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच, अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कण्हेरी परिसरातील वीटभट्टीचालक आणि अतीट येथील बाधित शेतकरी अडचणीत आले आहेत.

सध्या सुरू असलेल्या लघु कुंभमेळा २०२६ वरही या अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. पावसामुळे मेळ्यात आलेल्या भाविक आणि व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. जोरदार वारे आणि पावसामुळे वाई शहर व परिसरातील काही भागांचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता. कुंभ ठिकाणी मंडप आणि स्टॉलधारकांना साहित्य सावरण्याची वेळ आली.