सातारा : जिल्ह्यात सातारा, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, फलटण, म्हसवड आणि मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या उमेदवारी ठरविताना नेत्यांचे कसब पणाला लागले आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होऊन ते उमेदवारीच्या प्रतीक्षेत असतानाही अद्याप नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या अंतिम उमेदवारीवर नेतृत्वाचे एकमत होत नसल्याने उमेदवारी जाहीर होण्यास वेळ लागत आहे. इच्छुकांना उमेदवारी मिळली नाही तर नाराजी वाढून बंडखोरी होऊ नये, त्याचा फायदा विरोधकांनी घेऊ नये, याची काळजी नेतृत्वाकडून घेतली जात आहे.

मागील सात वर्षांत पालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. जिल्ह्यातील पालिकांमध्ये ११५ प्रभागांमध्ये जात निहाय आरक्षणासह २३३ नगरसेवक आहेत. अनेक पालिकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण (पुरुष)आरक्षण जाहीर झाले आहे. नगरसेवक पदासाठी महिला पन्नास टक्के राखीव आहेत. जागा मर्यादीत आणि इच्छुकांची संख्या मोठी आहे. पक्ष फुटीमुळे आता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराजांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळणे आणि नाराजांचा फायदा विरोधकांनी उचलू नये, याची काळजी नेतृत्वाला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत ही उमेदवारी जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे नेत्यांची प्रतिष्ठा आणि कसब पणाला लागली आहे.
सातारा शहरात खासदार उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, वाई, महाबळेश्वर, पाचगणी येथे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, म्हसवड येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. फलटण येथे आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांनी, मेढा येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुलाखती घेतल्या आहेत. गोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व शरद पवार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, काँग्रेस यांनी स्थानिक आघाडी केली आहे.

सातारा येथे भाजपच्या चिन्हावर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे एकत्रित निवडणूक लढविणार आहेत. सातारा भाजपा (५१३) वाई, पाचगणी महाबळेश्वर फलटण येथे मोठ्या संख्येने इच्छुक आहेत. नगराध्यक्ष पदासाठी अनेक दावेदार आहेत. सातारा येथे प्रथमच अनेक वर्षांनंतर पक्षपातळीवर निवडणूक होत आहे. त्यामुळे आघाड्यांमध्ये धुसफूस आहे. उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने कंबर कसली आहे. त्यांनी काही इच्छुकांच्या मुलाखती आणि काहींशी संपर्क साधला आहे.

वाई, महाबळेश्वर, पाचगणी पालिकेत मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनाही अद्याप थेट उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत. पाचगणी येथे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांच्या आघाडीमध्ये निवडणूक होणार आहे.

मागील सर्व निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी नेत्यांना मदत केलेली आणि आता नेत्यांनी द्यायची वेळ आली आहे. उमेदवार ठरविताना नेत्यांचे कसब आणि प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इच्छुक उमेदवार हे त्यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी उमेदवारी मिळावी, अशी इच्छा नेतृत्वाकडे व्यक्त केली आहे. मात्र, आता नगरसेवक, नगराध्यक्ष ठरविताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.