सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण तसेच इतर दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी ४ एप्रिल २०२६ रोजी दुसरी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटक पक्षाने सावध भूमिका घेत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. सभापतीपदी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना यापैकी कुठल्या पक्षांचे सभापती होणार याविषयी मोठी उत्सुकता आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर सभापती पदाच्या निवडी शनिवार (दि. ४) रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये होत आहेत. मागील राजकीय गोंधळाचा अनुभव लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केले आहेत. हे आदेश शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून सभा संपेपर्यंत लागू राहणार आहेत.

आदेशानुसार, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि बंदोबस्तावर नियुक्त पोलीस अधिकारी यांच्याशिवाय इतर कोणालाही या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पक्षांची सावध भूमिका

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्या सदस्यांना महाबळेश्वर येथे विशिष्ट ठिकाणी बैठकीच्या निमित्ताने बोलावून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता बहुतांश जिल्हा परिषद सदस्य महाबळेश्वर येथे असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचेच सभापती होतील, असा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. मात्र, प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेनंतर महायुतीतील मोठा भाऊ असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या साताऱ्यातील नेत्यांनी पुन्हा दोस्तीचा सूर अळवला आहे.

कराड उत्तर दक्षिण तसेच पाटण या तीन मतदारसंघातून किमान दोन सभापती पदांवर काही समर्थकांना संधी दिली जाऊ शकते. राष्ट्रवादीचे नेते मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्रमक रणनीती आखली आहे. पाचपैकी किमान दोन सभापती पदांवर संधी मिळावी, या दृष्टिने राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे.

शासकीय ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने व महायुतीचे सर्व नेतेमंडळी एकत्र आले होते. मात्र, त्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सभा होण्यापूर्वी साताऱ्यात महायुतीच्या घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.