सातारा : सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत किरकोळ वादावादीचे प्रसंगवगळता मतदान शांततेत पार पडले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बोगस मतदान आणि मतदान केंद्रात आलेल्या मतदारांना प्रलोभन दाखविण्याच्या कारणावरून वादावादीचे प्रसंग उद्भवले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ आणि पंचायत समितीच्या १३० गणांसाठी आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान झाले. जिल्ह्यातील २ हजार ८७७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली गेली. दुर्गम डोंगराळ चकदेव, कांदाटी खोरे, किल्ले प्रतापगड रायरेश्वर आदी भागातही मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया राबविली गेली. मतदान प्रक्रिया सुरळीत राबविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठी शिकस्त केली. मतदान प्रक्रियेसाठी १३ हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या वेळी भाजपविरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अशी चुरशीची लढत होत आहे. यामुळे सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. २१ लाख ९४ हजार ११० मतदारांपैकी दुपारी दीड वाजेपर्यंत आठ लाख सहा हजार ४६६ मतदारांनी (३६.७६ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी साडेतीनपर्यंत ११ लाख १९ हजार ४६१ (५१.०२ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. आज लग्नाची मोठी तिथी असल्याने अनेक ठिकाणी लग्नसोहळेही होते. लग्नाच्या गडबडीतही जावळी, फलटण, कराड तालुक्यात अनेक ठिकाणी नवरदेव आणि नवरी मुलीने लग्नाआधी मतदानाचे पवित्र कार्य पार पाडले. एका मतदान केंद्रावर हळदीच्या पोशाखात येऊन नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. तर, एका ठिकाणी लग्नविधी आटोपताच नववधूने मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले.
सातारा तालुक्यातील खेड गटात समर्थकांमध्ये वादावादी झाली. या परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले होते. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. कराड तालुक्यात बोगस मतदानावरून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले. कराड तालुक्यातही वडगाव हवेलीत तणावपूर्ण स्थिती पाहून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली.
मतदानासाठी महिलांमध्येही उत्साह होता. सकाळपासून मतदान केंद्रांवर महिलांच्या रांगा मोठ्या होत्या. वाई तालुक्यातील पसरणी, बावधन, भुईज येथे मोठी गर्दी होती. नवमतदारांनीही मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी मतदानासाठी मतदान केंद्रावर हजर झाले होते. गोळेवाडी (ता. कोरेगाव) येथे १०२ वर्षे वय असलेल्या आजोबांनी व ९८ व्या वर्षी आजींनी मतदानाचा हक्क बजावला.
फलटण येथे निवडणुकीच्या तोंडावर रात्री अघोरी बुवांच्या उपस्थितीने व त्यांची गाडी थांबवून चौकशी करण्यात आल्याने गोंधळ उडाला. मतदानापूर्वीच रात्री नाईक निंबाळकर गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाची जिल्हाभर चर्चा झाली. सातारा कृष्णानगर मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण होऊन मोठी वादावादी झाली. त्यामुळे तत्काळ घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रण आणली. वडगाव हवेली (ता. कराड) येथे भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी वादावादी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
सातारा, कराड, वाई, फलटण, कोरेगाव, पाटण, खंडाळा, खटाव माण, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यात सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदान झाले. सर्वांत जास्त मतदान महाबळेश्वर तालुक्यात झाले आहे. दुपारी साडेतीनपर्यंत या सर्व ठिकाणी ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. एक किरकोळ वादावादीचे प्रसंगवगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. मतदानासाठी जिल्हाभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दुपारी साडेतीननंतर मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर यंत्र बदलण्यात आले.

