“भाजपाचा मतांचा टक्का वाढला असं जर बोललं जात असेल, तर भाजपाने असं जाहीर करावं की त्यांना आरपीआयची, जनसुराज्य पक्ष, सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची आणि शिवसंग्राम संघटनेची, महाडिक गटाची मतं मिळालेली नाहीत. अत्यंत निकाराची लढाई त्यांनी लढली होती, पाच वर्षांपासून सुरू असलेली त्यांची अयशस्वी घौडदोड थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. परंतु दुसऱ्या बाजूला हे कोल्हापूर शहर पुरोगामी आहे, हे दाखवून देण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलेलं आहे. आता जरी त्यांच्या मतांचा टक्का वाढला असं वरवर दिसत असलं तरी पुढच्या निवडणुकांमध्ये तशी परिस्थिती राहणार नाही.” असं म्हणत कोल्हापूर पोटनिवडणुकीत किंगमेमकर ठरेलेले राज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे.

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, “हा कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा विजय होता, कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. ध्रुवीकरणाचा प्रचंड प्रयत्न कोल्हापूरमध्ये झाला, कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. समतेचा संदेश ज्यांनी जगाला दिला, त्या भूमीमधून दुर्दैवाने प्रचंड ध्रुवीकरण करण्यात आलं. द काश्मीर फाईल्स चित्रपटाची तिकीटं जवळपास २५-३० हजार लोकाना मोफत देण्यात आली. परंतु आम्ही सगळ्यावर मात केली, कारण तो काश्मीर फाईल्स बघायला जात असताना, ११६ रुपयांचं पेट्रोल गाडीत टाकून तो बघायला जावं लागतं आणि ११०० रुपये मोजून घेतलेल्या सिलिंडेरवर केलेला चहा घरी प्यावा लागतो, हे आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. महागाईचा मुद्दा देखील आम्ही प्रामुख्याने मांडला.” एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

तसेच, “कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपाने विखारी प्रचार केला, त्यांचे जवळपास ६१ आमदार कोल्हापूरात ठाण मांडून होते. ६० हजार कार्यकर्ते भाजपाचे कोल्हापूरात होते आणि परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही प्रमुख लोक देखील कोल्हापूरात येऊन बसले होते. पैशाचा मोठ्याप्रमाणात वापर केला, भाजपाचे काही कार्यकर्ते पैसे वाटताना देखील सापडले. प्रचंड साधनसामूग्री त्यांनी लावली होती. परंतु सुदैवाने कोल्हापूरकरांनी निर्णय घेतला की हे आपल्याला चालणार नाही आणि या विचाराने आपल्याला जायचं नाही.” असं देखील यावेळी सतेज पाटील यांनी बोलून दाखवलं.

…त्यामुळे २०२४ मध्ये ‘ही’ जागा आम्ही १०० टक्के जिंकणार – देवेंद्र फडणवीसांचं विधान!

कोल्हापूर पोटनिवडणुकीत जरी भाजपाचा पराभव झालेला असला तरी देखील भाजपाच्या मतांचा टक्का वाढल्याचं या निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे, असं भाजपा नेत्यांकडून सांगितलं जात आहे. शिवाय, यामुळे २०२४ मध्ये ही जागा निश्चितपणे भाजपा जिंकेल असा विश्वास देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपाला हे आव्हान दिलं आहे.