“राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपाच्या विरोधातील अनेक विषय उपस्थित होणार आहे. यामुळेच मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या फेर तपासाची मागणी करणारे विषय भाजपा उपस्थित करीत आहे. यामागे त्यांची निव्वळ राजकीय भूमिका असून, मागणीत काहीच अर्थ नाही,” अशा शब्दात गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी यांनी गुरुवारी येथे भाजपवर निशाणा साधला.

मुंबई येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यावरून भाजपाने फेरतपास करण्याची मागणी केली आहे. याविषयी पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले, ‘मुंबईतील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आरोपींना तातडीने पकडण्यात आले. अशा प्रकारचा भयावह हल्ला झाल्यानंतर जगाच्या पाठीवर आरोपींना तात्काळ पकडण्याच्या कारवाईतील ही एक कारवाई होती. त्याचा तपास अधिकाऱ्यांनी पूर्ण केला. त्यातून आरोपींना आपल्या भूमीत फाशीची शिक्षा होण्यापर्यंत अधिकाऱ्यांनी चोख काम बजावले. या सर्व प्रक्रियेवर तुम्ही शंका का घेत आहात’, असा प्रश्न पाटील यांनी केला.

‘यामुळे जे शहीद झाले. ज्यांनी बलिदान दिले. त्यांच्यावर शंका उपस्थित करण्यासारखे आहे. निव्वळ राजकारण करायचे हाच यामागे भाजपाचा उद्देश दिसतो. आगामी अधिवेशनात भाजपाच्या विरोधातील अनेक विषय येणार असल्याने नको ते विषय काढून त्याविषयी वातावरण वेगळे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तथापि या दहशतवादी हल्ल्याचा योग्यरीतीने तपास होऊन आरोपींना कठोर शिक्षाही झाली असल्याची लोकांना पूर्ण कल्पना आहे,’ असंही पाटील म्हणाले.

दाभोळकर, पानसरे हत्या; आठवड्याला आढावा घेणार-

कामगार नेते गोविंद पानसरे यांचा पाच वर्षांपूर्वी खून होऊन हल्लेखोरांवर कारवाई होत नसल्याबद्दल पानसरे कुटुंबीय व पुरोगामी चळवळीतून शंका उपस्थित केली जात आहे. नाराजी व्यक्त होत आहे. या विषयी बोलताना सतेज पाटील म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षात काही मागेपुढे झाले असेल. मात्र, आता मी स्वतः या प्रकरणांमध्ये लक्ष घातले आहे. याचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे. या प्रकरणाच्या तपासाची प्रगती बऱ्याच अंशी चांगली आहे. पण त्याची माहिती माध्यमांना देता येणार नाही. याबाबत निश्चिततेच्या आधारे निष्कर्षावर येणे अभिप्रेत आहे. ते काम लवकरच होईल. दाभोळकर, पानसरे यांची खुनी आणि त्यांचे सूत्रधार यांच्यापर्यंत निश्‍चितपणे लवकरच पोहचू’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.