Satej Patil On Ajit Pawar : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिकांच्या निवडणुकींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. मात्र, तरीही दोन्ही ठिकाणी भाजपाचा विजय झाला आणि राष्ट्रवादीचा पराभव झाला.
महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ऐन या निवडणुकीतच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असतानाच आज शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे दोघे महाविकास आघाडीत दिसतील असं संजय राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी देखील अजित पवार खरंच मविआत येतील का? यावर भाष्य केलं आहे. ‘चार वर्षांची सत्ता सोडून अजित पवार सत्तेपासून दूर जातील असं वाटत नाही’, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलत होते.
सतेज पाटील काय म्हणाले?
“अजित पवार यांचा राजकीय अनुभव पाहता आणि आता त्यांच्याकडे अर्थ खातं आहे. त्यामुळे सत्तेचा खरा अर्थ त्यांना समजलेला आहे. त्यामुळे ते सत्तेपासून दूर जातील असं मला वाटत नाही. मात्र, तसं झालं तर स्वागतच असेल. अजित पवार जर महाविकास आघाडीत आले तर महाविकास आघाडी आणखी मजबूत होईल”, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
“अजून चार वर्ष सत्ता बाकी आहे. ही चार वर्षांची सत्ता सोडून विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता अजित पवार यांची असेल असं मला वाटत नाही. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांचा केलेला अपमान आणि त्यांच्याबाबत केलेली वक्तव्य पाहता स्वाभिमानी अजित पवारांनी निर्णय घ्यायला काही हरकत नाही”, असंही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
अजित पवार महायुतीमधून बाहेर पडणार? संजय राऊतांचा मोठा दावा
अजित पवार यांच्याबाबत बोलताना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, “मी असा विचार करतो की, शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत. त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेत. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाट लावलेला आहे. अशा वेळी त्यांच्यावर तिथे (महायुतीत) कारवाई होईल. मला अशी खात्री आहे की भविष्यामध्ये शरद पवार-अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत दिसतील.”
अजित पवार सरकारमधून बाहेर पडतील का? असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की, “त्यांना बाहेर पडावे लागेल. एकावेळी दोन दगडांवर पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
