राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील ऐतिहासिक शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा यंदा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींचे भान राखत जलमंदिर पॅलेस येथील शाही सोहळ्यातील झगमगाट टाळण्याचा महत्त्वाचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. या निर्णयाबाबत त्यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

काय म्हटलं आहे उदयनराजेंनी?

यंदाच्या वर्षी विदर्भ-मराठवाडयासह संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाची दाहकता पसरत आहे. महाराष्ट्रातील ३५८ तालुक्यांपैकी ३०० पेक्षा जास्त तालुक्यांत राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. परतीच्या पावसाने दगा दिल्याने यंदा प्रचंड अवर्षण परिस्थिती निर्माण झाली आहे. जीवन मरणाचा संघर्ष दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर जलमंदिर पॅलेस येथील साजरा होणारा शाही विजयादशमी सिमोल्लंघन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

साताऱ्यातील सोहळ्याची ऐतिहासिक परंपरा

ऐतिहासिक दीर्घ परंपरा असलेला सातारचा विजयादशमीचा शाही सिमोल्लंघन सोहळा हा फक्त राजघराण्याचा नसून, तो संपूर्ण सातारकरांचा सोहळा म्हणून साजरा केला जात असतो. श्री भवानी तलवारीचे आणि आई तुळजाभवानीचे विधिवत पूजन, तसेच श्री भवानी तलवारीची शाही पालखी मिरवणूक, सातारा पोवईनाका येथे तत्कालीन वेशीवर पुजन आणि परत जलमंदिर पॅलेस येथे ही शाही मिरवणूक आल्यावर स्वागत औक्षण,यथोचित पूजन झाल्यावर विजयादशमीनिमित्त आपट्याचे सोने स्वीकारण्याचा सोहळा मोठया दिमाखात आणि डामडौलात साजरा केला जात असतो. मागील काही वर्षापासून शासनही या शाही सोहळ्यामध्ये सहभागी होत असून, शासनाव्दारे जलमंदिर पॅलेस येथे पोलिसबॅन्ड पथकाव्दारे शासनाकडूनही यथोचित सलामी दिली जात आहे.

अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन शाही सोहळा साधेपणाने करण्याचं आवाहन

यंदा विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्जन्यमान पूर्ण पावसाळयात अत्यंत कमी झाले आहे. विदर्भ मराठवाडयात प्यायला पाणी मिळणे आजच कठीण बनले आहे. महाराष्ट्रातील ३०० पेक्षा जास्त तालुके दुष्काळाने होरपळत आहेत. बळीराजाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. जनावरे जगवणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत शाही सिमोल्लंघन सोहळा मोठया दिमाखात साजरा करणे आम्हाला योग्य वाटत नाही. प्रथा परंपरेप्रमाणे सिमोल्लंघन सोहळा होईल परंतु अत्यंत साधेपणाने केला जाईल. या साधेपणाने साजरा होणा-या विजयादशमी सिमोल्लंघन सोहळयाची योग्य ती नोंद सर्व संबंधीतांनी घ्यावी, अनावश्यक खर्च तसेच बॅनरबाजी किंवा तत्सबंधी कृती टाळावी. व्यक्तीगत आणि सार्वजनिक जीवनातील अनावश्यक खर्चाला फाटा देवून कार्यकर्ते-नागरीकांनीही दुष्काळग्रस्तांसाठी जमेल ते कार्य योग्य पध्दतीने करावे.