नाना पटोलेंच्या 'त्या' दाव्यावर सत्यजित तांबेंचे थेट विधान; म्हणाले, "जेव्हा सत्य सांगेन तेव्हा चकित व्हाल, लवकरच..." | satyajeet tambe said soon will give information of congress and tambe family clash and nana patole claim | Loksatta

नाना पटोलेंच्या ‘त्या’ दाव्यावर सत्यजित तांबेंचे थेट विधान; म्हणाले, “जेव्हा सत्य सांगेन तेव्हा चकित व्हाल, लवकरच…”

विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

nana patole and satyajeet tambe
नाना पटोले, सत्यजित तांबे (संग्रहित फोटो)

विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघ केंद्रस्थानी आला असून येथे महाविकास आघाडीचा पाठिंबा लाभलेल्या शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे याच्यात थेट लढत होईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे कुटुंबात वाद असल्याचा आरोप केला आहे. याच आरोपांवर आता सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (२८ जानेवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> बाळासाहेब ठाकरे की आनंद दिघे, धक्कातंत्र कोणी शिकवलं? एकनाथ शिंदेंनी दिलं खास उत्तर; म्हणाले, “खरा धक्का…”

आम्ही काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी मागितली होती, पण…

“मी काँग्रेसचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी मागील २२ वर्षांपासून काँग्रेसचे काम करत आलो आहे. आमच्या परिवाराला २०३० साली काँग्रेस पक्षात १०० वर्षे पूर्ण होतील. आम्ही काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी मागितली होती. मात्र एबी फॉर्म न मिळाल्यामुळे माझी उमेदवारी अपक्ष झाली आहे,” असे सत्यजित तांबे यांनी सांगितले.

“नाना पटोले जे सांगत आहेत त्याविषयी आम्ही लवकर सविस्तरपणे राजकीय भूमिका मांडू. नाना पटोले जे सांगत आहेत, ते अर्धसत्य आहे. जेव्हा मी सत्य मांडेन तेव्हा सगळेच चकित होऊन जातील,” असेही तांबे म्हणाले.

हेही वाचा >>>  सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा? राधाकृष्ण विखे पाटील यांचं सूचक विधान; म्हणाले, “स्थानिक कार्यकर्त्यांनी…”

नाना पटोले नेमके काय म्हणाले?

उमेदवारीवरून तांबे कुटुंबात वाद आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. “नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दोन कोरे एबी अर्ज पाठवले होते. ऐनवेळी अशी धोकेबाजी होईल, याची कल्पना नव्हती. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध केला नव्हता. तसे असते तर कोरे अर्ज पाठवले नसते. आम्ही प्रामाणिक असल्याने उमेदवारीला विरोध केल्याचे अप्रमाणिक लोकांनी आरोप करू नये. मुळात उमेदवारीवरून तांबे कुटुंबीयात संघर्ष होता,” असे नाना पटोले म्हणाले. तसेच तांबे कुटुंबाच्या वादात काँग्रेसला आणू नका. पक्ष कुणाच्या घरचा नसतो. तो कार्यकर्त्यांचा असतो, असेही त्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 21:12 IST
Next Story
आधुनिकतेतून चितळे डेअरीने केली धवल क्रांती – नितीन गडकरी