काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर सत्यजित तांबेंनी अपक्ष निवडणूक लढवत विजय खेचून आणला. अपक्ष निवडून आल्यानंतर ते भाजपात जाणार की काँग्रेसमध्येच राहणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजित तांबे यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत घेऊन आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपली भूमिका स्पष्ट करताना सत्यजित तांबे म्हणाले की, “मागील महिनाभराच्या काळात आमच्या कुटुंबावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आमचं कुटुंब सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात आहे. २०३० मध्ये आमच्या कुटुंबाला काँग्रेस पक्षात येऊन १०० वर्षे होतील. आम्ही पक्षासाठी निष्ठेनं काम केलं. विविध आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही काम केलं. युवक काँग्रेससाठी काम करताना माझ्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे मला पासपोर्टही मिळत नव्हता. मी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे.”

हेही वाचा- “आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील…”, शिंदे गटाच्या नेत्याचा खोचक टीका!

तांबे पुढे म्हणाले की, युवक काँग्रेसचं पद गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला कुठेतरी संधी देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं जातं. त्याला विधान परिषदेवर घेतात. यासाठी ज्यावेळी मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे जायचो, तेव्हा तुमच्या घरात तुमचे वडील आमदार आहेत.त्यामुळे तुम्हाला विधान परिषद देता येणार नाही, असं सांगितलं जायचं. वास्तविक माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने नाशिक मतदारसंघ वाढवला आहे. २००९ पासून माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने हा मतदारसंघ उभा केला आहे.

हेही वाचा- “पक्षाने चुकीचे एबी फॉर्म दिले,” सत्यजित तांबेंचा गौप्यस्फोट! पत्रकार परिषदेतच दिले पुरावे

“मी आमचे पक्षश्रेष्ठी एच के पाटील यांना भेटून मला संधी द्या, असं सांगितलं. मी संघटनेत एखादं पद किंवा जबाबदारी मागितली होती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. तुम्ही तुमच्या वडिलांच्या जागेवर विधान परिषदेची निवडून लढा, असं मला सांगण्यात आलं, असं जेव्हा एच के पाटील बोलले तेव्हा मला प्रचंड संताप आला. मी त्यांना सांगितलं की, माझ्या वडिलांच्या जागेवर जर मला निवडणूक लढवायची असती, तर मी २२ वर्षे संघटनेसाठी काम का केलं? मी हा विचार वाढवण्याचं काम केलं. मला पक्षाने किंवा संघटनेनं काहीतरी द्यावं, अशी माझी मानसिकता आहे. वडिलांच्या जागी निवडणूक लढवावी, अशी माझी मानसिकता नाही. हे मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं. पण दुसरी कुठली संधी तुला देणं शक्य नाही, तू वडिलांच्या जागी प्रयत्न कर, असा सल्ला ते मला देऊ लागले. याला माझा पूर्णपणे विरोध होता,” अशी प्रतिक्रिया सत्यजित तांबेंनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satyajit tambe press conference congress rebel leader nashik graduate constituency rmm
First published on: 04-02-2023 at 16:39 IST