scorecardresearch

“देवेंद्रजी सत्यजीत तांबेंना…”, पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याचा ‘तो’ फोटो व्हायरल

नाशिक मतदारसंघातून सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज दाखल दाखल केला आहे.

“देवेंद्रजी सत्यजीत तांबेंना…”, पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याचा ‘तो’ फोटो व्हायरल
सत्यजीत तांबे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

नाशिक विधान परिषद निवडणुकीत मोठा गुरुवारी मोठा ट्वीस्ट पाहायला मिळाला. नाशिक पदविधाक मतदासंघातून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पण, ऐनवेळी सुधीर तांबे यांनी माघार घेत त्यांच्याऐवजी पुत्र व युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तर, भाजपाने सत्यजीत तांबेंना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यावर सत्यजीत तांबे म्हणाले की, “मी काँग्रेस पक्षाचाच आहे. तरुणांना संधी मिळावी म्हणून वडिलांनी अर्ज दाखल केला नाही. मला पक्षाचे अधिकृत पत्र ( ए-बी फॉर्म ) वेळेत मिळू शकले नाही. त्यामुळे मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहे. भाजपा, शिवसेनेने दोन्ही गट, मनसे, रासप आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे,” असं सत्यजीत तांबेंनी सांगितलं.

हेही वाचा : “लातूरचा देशमुख वाडा…”, भाजपा प्रवेशावर अमित देशमुखांनी सोडलं मौन

अशात सत्यजीत तांबे यांचा जुना एक फोटो व्हायरल होत आहे. सत्यजीत तांबे युवक प्रदेशाध्यक्ष असताना इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. तेव्हा, सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले होतं. सत्यजीत तांबेंचा हा फोटो तुषार खरे या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर लिहलं की, ‘देवेंद्रजी सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार ना?,’ असा सवाल उपस्थित केला आहे.

“सुधीर तांबेंनी काँग्रेस पक्षाशी दगाफटका केला”

याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणे आणि त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाचा मागणे, हे पूर्वनियोजित आहे. सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाशी दगाफटका केला. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रस पक्ष सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही,” असं नाना पटोलेंनी स्पष्टीकरण दिलं.

हेही वाचा : “तांबे पिता-पुत्रांकडून काँग्रेसची फसवणूक” नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “हा धोका…”

“…तर विचार करू”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, “भाजपातर्फे राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाचाच विचार आम्ही करत होतो. राधाकृष्ण विखे पाटील यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला होता. पण मागच्या सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तर तयारीला वेळ मिळाला असता, अशी भूमिका राजेंद्र विखे पाटील यांनी मांडली आणि निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. आता आम्हाला दिसतंय की, ही अपक्ष निवडणूक होईल. भाजपाने अजून कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी भाजपाकडे पाठिंबा मागितल्यास विचार करु”, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “जगाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय घेणारे मुख्यमंत्री”, गुलाबराव पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना टोला

फडणवीस यांची मदत?

सत्यजीत तांबे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. अलीकडेच तांबे यांच्या पुस्तक प्रकाश समारंभात फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा, “सत्यजीत यांना असे मोकळे ठेवू नका नाहीतर आमची नजर जाते,” असं सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 13:36 IST

संबंधित बातम्या