रत्नागिरी – स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांनी हिंदुत्वाचा नव्हे, तर राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार केला आहे. विद्यार्थ्यांनी धार्मिक वादात न अडकता राष्ट्रीय एकात्मतेचा विचार जोपासावा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी केले. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एसपी हेगशेट्ये महाविद्यालय आणि नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या अनुषंगाने मधु संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पद्मश्री मधुमंगेश कर्णिक बोलत होते.
ते म्हणाले, आज भारताला खऱ्या अर्थाने नवनिर्माणाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक आहे आणि ते टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा भेदांच्या चौकटीत अडकण्याची गरज नाही. आपण सर्व भारतीय आहोत. लोकमान्य टिळक आणि सावरकर यांनी राष्ट्रीयत्वाचा विचार मांडला. सावरकरांनी अंदमानात देशासाठी शिक्षा भोगली, हे समजून घेणे आवश्यक आहे.
एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, गं. प्र. प्रधान, साने गुरुजी, बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते अशा समाजवादी व पुरोगामी विचारवंतांच्या संस्कारांतून घडलेल्या नवनिर्माण शिक्षण संस्थेत, या थोर नेत्यांना प्रत्यक्ष पाहिलेले आणि त्यांच्या विचारांनी घडलेले मधुमंगेश कर्णिक आज वयाच्या ९६ व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वैचारिक परंपरेचा आज ते एकमेव जिवंत दुवा असल्याची भावना सर्वांनाच भावून गेली.
कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या विशेष प्रयत्नांतून ही भेट साकार झाली. मधु कर्णिक यांनी एस. एम. जोशी यांच्या महाराष्ट्रातील एकमेव पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनेक आठवणींना उजाळा दिला. नवनिर्माणचा धागा पकडत त्यांनी मागील शतकातील रत्नागिरीच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला.
यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये म्हणाले, मधुभाईंचे नवनिर्माणच्या प्रांगणात आगमन अत्यंत प्रेरणादायी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या एस. एम. जोशी यांच्या आदर्शांवर उभी असलेली नवनिर्माण संस्था त्यांचा वैचारिक वारसा जपत आहे. मधुमंगेश कर्णिक हे जयवंत दळवी आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या विचारपरंपरेला पुढे नेत आहेत. मालगुंड येथील त्यांनी उभारलेले केशवसुत स्मारक हे जागतिक दर्जाचे स्मारक आहे. नवनिर्माणच्या अनवानी ते समृद्धी अशा वाटचालीला मधुभाईंचा आशीर्वाद मिळाला हा खरोखरच भाग्याचा क्षण असल्याचे अभिजीत हेगशेट्ये म्हणाले.
या कार्यक्रमाला भाषा व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळी, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, डॉ. पाखरे, लेखिका रश्मी कशेळकर, कवयत्री अमृता नरसाळे तसेच कोमसापचे अनेक पदाधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
