​सावंतवाडी : मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या अनेक घटना समोर येत असतानाच, सावंतवाडी शहरातील अतिशय गजबजलेल्या सालईवाडा परिसरात बिबट्या आणि गवा रेडा यांच्यातील संघर्षाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानवी वस्तीत गव्यांचा वावर नित्याचाच झाला असताना आता चक्क बिबट्याचेही आगमन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार वन विभागाचे प्रधान कार्यालय आणि उपवनसंरक्षक यांच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर घडला आहे. सावंतवाडी शहराची शान असलेल्या नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या सालईवाडा परिसरात बिबट्या आणि गव्यांचा हा थरार नागरिकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला.

​नेमका काय घडला प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, सालईवाडा परिसरात नेहमीप्रमाणे गव्यांचा कळप वावरत होता. मात्र, त्याच वेळी त्यांच्या मागावर असलेला एक बिबट्या तेथे दाखल झाला. गव्यांची शिकार करण्याच्या उद्देशानेच बिबट्या त्यांच्या मागे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या दरम्यान, गव्यांच्या मागे बिबट्या आणि बिबट्याला हुसकावण्यासाठी त्याच्या मागे धावणारे गवे असा हा पाठशिवणीचा खेळ थेट मानवी वस्तीजवळ रंगला होता. हा संपूर्ण थरार काही नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

मंगळवारी सायंकाळी विनोद सावंत, किरण पेडणेकर आणि शिवप्रसाद पुराणिक यांनी या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे पथक आणि रॅपिड ॲक्शन फोर्सचे वनरक्षक मोहन रेडकर व वनरक्षक मोहन दळवी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही वन्यप्राण्यांना मानवी वस्तीपासून दूर जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

​वनविभागाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह:

वनविभागाने यापूर्वीच वन्यप्राण्यांना वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी या परिसरात सुरक्षा कुंपण (फेन्सिंग) उभारले होते. मात्र, गव्यांनी हे कुंपण तोडून पुन्हा वस्तीत प्रवेश केला आहे. त्यामुळे वनविभागाने केलेल्या सुरक्षात्मक उपाययोजनांच्या प्रभावीपणावर आता स्थानिक नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

​वनविभागाचे आवाहन व स्थानिकांची मागणी:

या घटनेनंतर वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सकाळच्या व सायंकाळच्या वेळी जंगलालगतच्या भागात अनावश्यक फिरणे टाळावे, वन्यप्राण्यांचा पाठलाग करू नये आणि त्यांना स्वतः हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.दरम्यान, सालईवाडा परिसरात दिवसेंदिवस वन्यजीवांचा वावर वाढत चालल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने केवळ तात्पुरती कारवाई न करता या समस्येवर कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी भागातील रहिवाशांकडून केली जात आहे.