सावंतवाडी : येथील अक्षय मठकर आणि नुपूर मठकर या दांपत्याने जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रतिकूल हवामान आणि अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गिर्यारोहक जोडप्याने हे आव्हान पूर्ण केले असून, त्यांच्या या यशामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या साहसी कामगिरीबद्दल संपूर्ण कोकण व महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​हे खडतर आव्हान फत्ते केल्यानंतर आज हे दांपत्य सावंतवाडीत आपल्या घरी परतले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी व मित्रपरिवाराने फटाक्यांची आतिशबाजी आणि मिठाई वाटून त्यांचे जंगी स्वागत केले.

​आपल्या भावना व्यक्त करताना अक्षय मठकर म्हणाले, “माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत जाण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली होती. कुटुंबाची खंबीर साथ लाभल्यामुळेच आम्ही हे अवघड ध्येय साध्य करू शकलो. आमच्यामुळे सावंतवाडीच्या नावलौकिकात भर पडत आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे.” तर, “या मोहिमेसाठी आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने तयारी करत होतो. वाटेत अनेक आव्हाने आली, पण ती पूर्ण करण्याचा आम्ही ठाम निश्चय केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि माहेर-सासरच्या मंडळींकडून मिळालेला पाठिंबा यामुळेच ही प्रेरणा मिळाली,” अशी भावना सौ. नुपूर मठकर यांनी व्यक्त केली.

​या स्वागत सोहळ्याप्रसंगी बाळकृष्ण मठकर, भारती मठकर, अनिल चोडणकर, शर्वरी चोडणकर, संजय मठकर, श्रावणी मठकर, अदित मठकर, दुर्वा मठकर, श्रीया मठकर, आबा पिंगुळकर, मीना पिंगुळकर, ऐश्वर्या पिंगुळकर, उमेश पिंगुळकर, ज्योती कारेकर, साईप्रसाद मालवणकर, सावी मालवणकर, श्रीजा मालवणकर, प्रशांत मठकर, प्रिया मठकर, सुनील शिरोडकर, पूजा शिरोडकर, अचल माणगावकर, डॉ. अनिश स्वार, कुणाल खोत, पावन चोडणकर, सूरज नाटेकर, प्रतीक चोडणकर, संकल्प तेंडोलकर, मिहिर मठकर आदी उपस्थित होते.