सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील मांगेली फणसवाडी येथे फणस काढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर जंगली अस्वलाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. विष्णू लाडू गवस (वय ४९) असे या जखमी शेतकऱ्याचे नाव असून, त्यांना अधिक उपचारासाठी गोव्यातील बांबोळी रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी विष्णू गवस हे त्यांच्या घराशेजारील शेतात झाडावर फणस काढण्यासाठी चढले होते. त्याच वेळी तिथे आलेल्या एका जंगली अस्वलाने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्या असून, हात आणि पायांवरही नखांनी ओरबाडल्याच्या खुणा आहेत.

अस्वलाने हल्ला केल्यानंतर गवस यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून ग्रामस्थ धावून आले आणि त्यांनी अस्वलाला पळवून लावले. त्यानंतर, जमलेल्या ग्रामस्थांनी तातडीने जखमी गवस यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर पुढील उपचारांसाठी गोव्याला हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी गवसांची चौकशी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मांगेली फणसवाडी हा भाग जंगल आणि ग्रामीण वस्तीच्या सीमेवर आहे. तसेच, कर्नाटक वन जंगलही जवळच असल्याने या परिसरात वन्य प्राण्यांचा, विशेषतः अस्वलांचा, मोठ्या प्रमाणात वावर असतो. काही महिन्यांपूर्वीही तळेवाडी येथील एका शेतकऱ्यावर काजू बागेत असताना अस्वलाने हल्ला केला होता.