​सावंतवाडी: सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जैवविविधतेचा अनमोल ठेवा दडलेला असतानाच, आता सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात दोन अत्यंत दुर्मिळ ‘किंग कोब्रा’ (राजनाग) आढळून आले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील सरमळे आणि दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले परिसरात हे नाग दिसून आल्याने पर्यावरणप्रेमींना सुखद धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, सावंतवाडी तालुक्यात किंग कोब्रा आढळण्याची ही पहिलीच नोंद असल्याचे सांगितले जात आहे.

​रबर प्लांटेशनमध्ये १२ ते १५ फुटी नाग:

सावंतवाडी तालुक्यातील सरमळे येथील मॅथ्यु शॉबिन यांच्या रबर प्लांटेशनमध्ये एक अजस्त्र नाग असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळाली. याची माहिती मिळताच स्थानिक सर्पमित्र योगेश वेंगुर्लेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने सापाचे रेस्क्यू केले असता, तो तब्बल १२ ते १५ फूट लांबीचा ‘किंग कोब्रा’ असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी दोडामार्ग तालुक्यातील तळकट परिसरात असा नाग आढळला होता, मात्र सावंतवाडी तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

​वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त:

या घटनेची माहिती तातडीने सावंतवाडी वन विभागाला देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सापाची प्राथमिक आरोग्य तपासणी केली. त्यानंतर उप वनसंरक्षक मिलीश शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, वनकर्मचारी व जलद बचाव पथकाच्या देखरेखीखाली या राजनागाला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

​ही मोहीम वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक पवन रामचंद्र रेडकर, शुभम पाठक आणि शुभम कळसुलकर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सह्याद्रीच्या पट्ट्यात राजनागाचे अस्तित्व दिसून आल्याने येथील पर्यावरण समृद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे मत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.