सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील घोटगे आणि भेकुर्ली परिसरात सध्या सात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांची मोठी दैना उडाली आहे. घोटगे येथे काजू बागेत काम करताना हत्तींचा कळप अचानक समोर आल्याने झालेल्या धावपळीत ८० वर्षीय वृद्ध शेतकरी आत्माराम दळवी मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले. त्यांचा मुलगा भरत दळवी यांनी जीवाची पर्वा न करता वडिलांना उचलून सुरक्षित स्थळी नेले, मात्र या धावपळीत दोन महिला शेतकरी जखमी झाल्या आहेत.
काजू हंगामावर हत्तींचे सावट
सध्या काजूचा हंगाम सुरू असल्याने काजूची बोंडे खाण्यासाठी हत्ती बागायतींमध्ये शिरत आहेत. भेकुर्ली येथे ‘बाहुबली’, तर घोटगे येथे ‘गणेश’ व ‘ओंकार’ नावाचे हत्ती स्वतंत्रपणे वावरत आहेत. तसेच दोन हत्तीण व दोन पिल्ले असा चार हत्तींचा गटही याच परिसरात आहे. २-३ किलोमीटरच्या परिघात हे सातही हत्ती विभागलेले असल्याने शेतकऱ्यांनी बागेत जायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी मोर्ले येथे ओंकार हत्तीने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याची भीती अजूनही कायम असतानाच आता पुन्हा हा थरार सुरू झाला आहे.
एवढी मोठी घटना घडूनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साधी विचारपूस करण्यासाठीही घटनास्थळी भेट दिली नसल्याचा आरोप भरत दळवी यांनी केला आहे. परिसरात वनविभागाचे पथक तैनात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे नुकसान आणि भीती कमी झालेली नाही. “आमची शेती आणि बागायती जणू वन्य प्राण्यांसाठीच आहे, अशी वागणूक शासन आम्हाला देत आहे,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.
२३ वर्षांपासूनचा वनवास संपणार कधी?
तिलारी खोऱ्यात हत्तींच्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून गेल्या २० वर्षांपासून आंदोलने आणि निवेदने दिली जात आहेत. मात्र, सरकारकडून केवळ पोकळ आश्वासने मिळत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. हाता तोंडाशी आलेला काजूचा घास हत्ती हिरावून घेत असताना शासन आणि प्रशासन ढिम्म हलत नसल्याने दोडामार्ग तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यात वन विभाग सपशेल फेल झाले आहे तर वन विभाग जंगलात फळझाडे किंवा वन्यजीवांना लागणारे अन्न आणि पाणी उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने वन्य प्राणी लोकवस्ती असलेल्या शेती व बागायती मध्ये जाऊन नुकसान करत आहेत.
सावंतवाडी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे म्हणाले, या जंगली हत्तीवर वन विभाग लक्ष ठेवून आहे. ओंकार हत्तीला पकडण्याचा निर्णय न्यायालयीन निर्णयामुळे स्थगित आहे. उच्चस्तरीय समितीकडे न्यायालयाच्या निर्णयावर अपील दाखल करण्याबाबत सल्ला मागितला आहे. दरम्यान गणेश व ओंकार हत्ती घोटगे, बाहुबली भेकुर्ली तर दोन हत्तीण आणि दोन पिल्ले एकत्र घोटगे मध्ये आहेत. या सातही हत्तीवर वन विभाग लक्ष ठेवून आहे.

