​सावंतवाडी:- सावंतवाडी शहरातील एका बँकेत भरण्यात आलेल्या २०० रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, या गुन्ह्याचे धागेदोरे सांगलीपर्यंत पोहोचले आहेत. सांगली कारागृहात असलेल्या सहा संशयित आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

​बँकेत आढळल्या होत्या बनावट नोटा:

​काही दिवसांपूर्वी सावंतवाडी येथील एका बँकेत रोख रक्कम भरण्यात आली होती. या रकमेची तपासणी करताना २०० रुपयांच्या ८ नोटा बनावट असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. याप्रकरणी बँक व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या नोटांच्या सिरीजचा (सीरियल नंबर) बारकाईने तपास सुरू केला.

​सांगली गुन्ह्याशी जुळली सिरीज

​तपासादरम्यान सावंतवाडीत सापडलेल्या बनावट नोटांची सिरीज आणि सांगली शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील जप्त नोटांची सिरीज एकच असल्याचे समोर आले. या तांत्रिक पुराव्यावरून सावंतवाडी पोलिसांनी सांगली येथील न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशाने सांगली कारागृहातून सहा आरोपींना ताब्यात घेतले.

​सावंतवाडी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये सुप्रीत कडप्पा देसाई (वय २२, रा. कोल्हापूर),राहुल राजाराम जाधव (वय ३३, रा. कोल्हापूर),इब्रार आदम इनामदार (वय ४४, रा. कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, रा. कोल्हापूर), संदीप बाळू कांबळे (वय ३८, रा. कोल्हापूर), सिद्धेश जगदीश म्हात्रे (वय ३८, रा. मालाड-मुंबई) यांचा समावेश आहे.

​दोन दिवसांची पोलीस कोठडी:

​सांगली येथून ताब्यात घेतल्यानंतर या सर्व आरोपींना काल सोमवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात अधिकृतपणे अटक करण्यात आली. आज त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
​पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या टोळीने कोकणात आणखी कोठे अशा नोटा चलनात आणल्या आहेत का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.