सावंतवाडी : नियम सांगणाऱ्यांनीच नियमांची पायमल्ली केल्याचा धक्कादायक प्रकार सावंतवाडी येथे उघडकीस आला आहे. सावंतवाडी वनविभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात चक्क दहाहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली असून, ज्या विभागाने वृक्षांचे रक्षण करायचे त्यांनीच झाडे तोडल्याने ‘जाब कोणाला विचारायचा?’ असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी वनविभागाच्या कार्यालय परिसरात पार्किंगची सोय करण्याच्या नावाखाली ही वृक्षतोड करण्यात आली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाशेजारील झाडांसह, कार्यालयाच्या उद्यानातील (गार्डन) अनेक वर्षांपासून जोपासलेल्या वृक्षांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पर्यावरणाचे रक्षण ज्यांच्या हाती आहे, त्याच विभागाने अशा प्रकारे झाडांवर कुऱ्हाड चालवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एखाद्या सामान्य शेतकऱ्याने किंवा गरिबाने आपल्या गरजेसाठी एखादे झाड तोडले, तर वनविभाग तातडीने कारवाईचा बडगा उगारतो. चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावून गुन्हे दाखल केले जातात. मात्र, आता वनविभागाच्या स्वतःच्या अंगणातच दहा-दहा झाडे तोडली जात असताना नियम कुठे गेले, असा प्रश्न आता विचारला जात आहे. काही जागरूक वन कर्मचाऱ्यांनीच या प्रकाराबाबत नाव न छापण्याच्या अटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणाबाबत उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की:
”या परिसराचा विकास करण्यासाठी ही झाडे परवानगी घेऊनच तोडण्यात आली आहेत, असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. तरीही, या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सावंतवाडी वनक्षेत्रपालांना दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील माहिती देता येईल.”
विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी दिला जात असताना, वनविभागाने दाखवलेली ही तत्परता संशयास्पद मानली जात आहे. जर अधिकारीच अशा प्रकारे ‘राजरोस’ वृक्षतोड करणार असतील, तर सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा सवाल आता सावंतवाडी परिसरातून विचारला जात आहे. ही वृक्षतोड खरोखरच अधिकृत होती की पार्किंगच्या सोयीसाठी नियमांना बगल देण्यात आली, हे आता चौकशीनंतरच स्पष्ट होईल.
