सावंतवाडी : सध्या लग्नसराईचे दिवस असून सर्वत्र सनई-चौघड्यांचे सूर घुमू लागले आहेत. मात्र, दुसरीकडे वाढती महागाई, बेरोजगारी आणि बदलत्या सामाजिक अपेक्षांमुळे लग्न जमवणे ही एक मोठी कसरत बनली आहे. विशेषतः ग्रामीण भागात लग्नासाठी मुले उपलब्ध असूनही मुली मिळत नसल्याने अनेक ‘नवरोबां’समोर चिंतेचे ढग दाटले आहेत.
आखाती देशातील युद्धाचा लग्नावर परिणाम:
आखाती देशांमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक अस्थिरतेचे चटके आता थेट कोकणातील लग्नघरांनाही बसू लागले आहेत. सोन्या-चांदीच्या दरांनी गगन गाठल्याने मध्यमवर्गीय आणि गोरगरीब कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. सोन्याचे दागिने करणे आवाक्याबाहेर जात असल्याने, काही कुटुंबांना जमिनी किंवा झाडे विकून लग्नाचा खर्च भागवावा लागत आहे.
औद्योगिक गॅस टंचाई आणि जेवणाचा ‘मेन्यू’:
पूर्वीच्या काळी लग्नाचे मांडव घरात किंवा गावात पडत असत. संपूर्ण गाव एकत्र येऊन कार्य पार पाडत असे. मात्र, आता ‘हॉल संस्कृती’ वाढली आहे. घरगुती आणि औद्योगिक गॅसच्या वाढत्या किमती आणि टंचाईमुळे मंगल कार्यालयांचे दर वाढले आहेत. परिणामी, जेवणाच्या मेन्यूमध्ये तडजोड करावी लागत आहे, तरीही प्रत्यक्ष खर्चात कोणतीही कपात होताना दिसत नाही. खर्च वाचवण्यासाठी आता वधू आणि वर पक्ष मिळून हॉलचा खर्च अर्धा-अर्धा उचलण्यावर भर देत आहेत.
मुलींच्या वाढत्या अपेक्षा आणि बेरोजगारीचा प्रश्न लग्नाच्या बाजारात सध्या मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असल्याचे चित्र आहे. त्यातच मुलींच्या कुटुंबाकडून अवास्तव अटी ठेवल्या जात आहेत. मुलगा मुंबई-पुण्यासारख्या शहरात नोकरीला असेल, तर तिथे त्याची स्वतःच्या मालकीची खोली आहे का? याची प्रामुख्याने विचारणा केली जाते. बेरोजगारीमुळे अनेक तरुण आजही स्थिर नाहीत, जे लग्नासाठी सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. दुसरीकडे, तरुणी – तरुणांमध्ये प्रेमविवाहाचा कल वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
काय म्हणतात तज्ज्ञ?
“सध्या लग्नासाठी मुले मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, मात्र त्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. हाय-फाय अपेक्षा आणि नोकरीसोबतच स्वतःच्या घराची अट यामुळे अनेक लग्ने जुळता जुळता तुटत आहेत. महागाई आणि बेरोजगारी हा लग्नाइच्छुकांसमोर असलेला सर्वात गंभीर प्रश्न आहे.” शुभमंगल सावधान ग्रुप चे श्री.मंथन गवस यांनी सांगितले.
एकंदरीतच, बदलती जीवनशैली आणि आर्थिक गणिते यामुळे ‘शुभमंगल’ म्हणताना सर्वसामान्यांची मोठी दमछाक होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
