सावंतवाडी: मालवण तालुक्यातील बुधवळे मळेशेत येथे शनिवारी रात्री भक्ष्याच्या शोधात निघालेला एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली. स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
रविवारी सकाळी बुधवळे मळेशेत येथील विहिरीत बिबट्या पडल्याचे स्थानिक ग्रामस्थ राजू मुणगेकर आणि संदीप बुधवळेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि जलद बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाने बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट सुस्थितीत असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला पुन्हा सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
वन्यप्राणी बिबट हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून, तो भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार संरक्षित आहे. या प्राण्याची शिकार करणे किंवा शिकारीचा प्रयत्न करणे हा गंभीर गुन्हा असून, यात द्रव्यदंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
ही मोहीम उपवनसंरक्षक मिलिश शर्मा आणि सहायक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
