सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि शहर स्वच्छ-सुंदर राखण्यासाठी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ चा ५६ कोटी ४७ लाख १३ हजार ८७३ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी मंजूर करण्यात आला. प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये प्रामुख्याने भुयारी गटार योजना, मोती तलाव सुशोभीकरण आणि जिमखाना मैदानासह आरोग्य व पाणीपुरवठ्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

​नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांच्या ऑनलाइन उपस्थितीत आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. यावेळी शिंदे शिवसेना नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण मांडणी करत काही अवास्तव खर्चाच्या तरतुदींवर हरकतही नोंदवली.

​अर्थसंकल्पाची महत्त्वाची आकडेवारी:

  • ​एकूण जमा: १४९ कोटी ९७ लाख २७ हजार ८७३ रुपये.
  • ​एकूण खर्च: ९३ कोटी ५० लाख १४ हजार रुपये.
  • ​अखेरची शिल्लक: ५६ कोटी ४७ लाख १३ हजार ८७३ रुपये.

​प्रमुख विकास प्रकल्प आणि तरतुदी:

​सांडपाणी व पाणीपुरवठा: शहरात सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुयारी गटार योजना राबवण्यात येणार असून, २०२६-२७ या वर्षासाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे (एकूण प्रकल्प ८० कोटी). तसेच शहर पाणीपुरवठा योजना सुधारण्यासाठी १७.५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

​मोती तलाव व पर्यटन: शहराची अस्मिता असलेल्या मोती तलावाचे सुशोभीकरण आणि तिथे बोटिंग क्लब सुरू करून ५ लाखांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शिल्पग्राम, हेल्थ पार्क आणि जलतरण तलावातून ४२.५ लाखांच्या महसुलाची अपेक्षा आहे.

​क्रीडा व आरोग्य: जिमखाना मैदान आणि क्रीडा संकुलाचा दर्जा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी २५ लाख, तर रस्त्यांच्या दुरुस्ती व खड्डे भरण्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

​शासकीय अनुदान: नगरोत्थान जिल्हा अनुदानातून ५ कोटी, अग्निशमन सेवा बळीकटीकरणासाठी १.५ कोटी आणि दलित वस्ती सुधार योजनेसाठी ३५ लाखांच्या निधीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

​महसूल वाढ आणि काटकसरीचे धोरण ​नगरपरिषदेच्या मालकीच्या जमिनी, मैदाने आणि गाळ्यांच्या भाड्यापोटी सुमारे ६२ लाखांहून अधिक उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. पाणीपट्टीची १००% वसुली करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. दुसरीकडे, वाढता खर्च लक्षात घेता मनुष्यबळ, वाहनांची देखभाल आणि इंधनावरील खर्चात कपात करून आर्थिक शिस्त पाळण्याचे धोरण स्वीकारल्याचे अ‍ॅड. निरवडेकर यांनी स्पष्ट केले.

​”शहराला २४ तास पाणीपुरवठा करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी भुयारी गटार योजना राबवणे ही आमची प्राथमिकता आहे. शहराच्या वैभवात, पर्यटनात भर टाकणारे प्रकल्प या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी आहेत.” असे प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी सांगितले.