सावंतवाडी: संत ज्ञानेश्वरांनी तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारले. त्याकाळी ज्ञानाला भाषा आणि गुरू-शिष्य परंपरेची मर्यादा होती, मात्र माऊलींनी या मर्यादा बाजूला सारून वेळप्रसंगी व्यवस्थेला जाब विचारण्याचे काम केले. संतांनी आपल्याला ‘हो मध्ये हो’ न मिसळण्याचा संदेश दिला आहे, त्यामुळे आपणही जीवनात थोडी चिकित्सा करायला हवी, असे प्रतिपादन प्रबोधनकार व व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.
सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र आयोजित ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षा निमित्त ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ या आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर व्याख्याते गणेश शिंदे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, विनायक गांवस, कार्यक्रम संयोजक सिद्धेश कुंठे आदी मान्यवर उपस्थित होते.
गणेश शिंदे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून माऊलींच्या जीवनातील आपेगाव ते आळंदीपर्यंतच्या प्रवासाचे भावस्पर्शी वर्णन केले. ज्ञानेश्वरी हा केवळ एक ग्रंथ नसून तो मानवी जीवनाचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. पसायदानातून मिळणारा विश्वबंधुत्वाचा संदेश आजच्या काळात अधिकच समर्पक वाटतो. माऊलींच्या विचारांची मशाल प्रत्येकाने आपल्या घराघरांत तेवत ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण गायिका सन्मिता धापटे-शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग गायन ठरले. ‘अवघा रंग एक झाला’, ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’ यांसारख्या रचनांनी सभागृहातील वातावरण भक्तीरसाने न्हाऊन निघाले. त्यांना प्रतीक्षा डुडे (पार्श्वगायन), अभिषेक पवार (तबला), स्वप्नील घाटोळे (संवादिनी), कीर्तेश बाविस्कर (बासरी), विवेक शिळकर (पखवाज), नरेंद्र काळे (साईड रीदम) आणि प्रणव देशपांडे (कीबोर्ड) यांनी साथसंगत केली. सावंतवाडीकर रसिकांनी या कार्यक्रमाला टाळ्यांच्या प्रतिसादात दाद दिली.
