सावंतवाडी : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या वादातून सावंतवाडीतील सर्वोदय नगर परिसरात झालेल्या मारामारी प्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेला मुख्य संशयित सागर कारिवडेकर याला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री कारिवडे येथे सासरवाडीला आला असता पोलिसांनी ही कारवाई केली.

​२६ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री सर्वोदय नगर येथे पुण्याचे गुंतवणूकदार शौनक सपकाळ यांच्यावर गाडी घालून खुनाचा प्रयत्न व मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यातील तहा राजगुरू, तला राजगुरू (रा. बांदा) आणि नितीन मेस्त्री (रा. कोलगाव) यांना आधीच अटक करण्यात आली होती, मात्र सागर कारिवडेकर तेव्हापासून फरार होता.

​आज तो कारिवडे येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार महेश जाधव आणि महेश निरवडेकर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला रविवारी रात्री ८ च्या सुमारास अटक करण्यात आली आहे.सागर कारिवडेकर याच्यावर मुंबई ठाणे येथेही आर्थिक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास एखपीआय पंकज शिंदे व जयेश खंदरकर करत आहेत.