सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावातील अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा डाव असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आज २० मे रोजी होणारी जमीन मोजणी उधळून लावली. काही धनाढ्य दलाल आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत शिरशिंगे येथील ग्रामस्थ, तरुण आणि चाकरमान्यांनी एकत्रित येत या मोजणीला तीव्र विरोध दर्शवला.

​ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भू-माफियांनी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गरीब आणि अशिक्षित शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवले आहे. त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेत ही सामाईक जमीन खरेदी केली जात आहे. महसूल खात्याकडून ही खरेदीखते नोंदवताना इतर कोणत्याही कायदेशीर सहधारकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून ही खरेदीखते केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

​आज भूमी अभिलेखचे अधिकारी मोजणीसाठी गावात आले असता ग्रामस्थांनी त्यांना रोखले. यावेळी बोलताना ग्रामस्थ नारायण राऊळ म्हणाले की, शिरशिंगे गावची जमीन धडे वाटप न करता विकण्याचा घाट घातला आहे, त्याला आमचा एकमताने विरोध आहे. तर ग्रामस्थ पांडुरंग राऊळ यांनी धनदांडग्या व्यक्ती आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या या डावाविरोधात ग्रामस्थांची एकजूट दाखवून देण्याचा इशारा दिला.

​याबाबत शिरशिंगे गावचे सरपंच दीपक राऊळ यांनी सांगितले की, “आमच्या पूर्वजांनी ही सामाईक जागा राखली असून ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत विकू देणार नाही. गावाबाहेरील व्यक्तींना जमीन विकू नका, जमीन राहिली तरच गाव, मंदिर आणि गावपण राहील. ग्रामस्थांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि शासनानेही अशा चुकीच्या पद्धतीने काम करू नये.”

​ग्रामस्थांच्या या तीव्र विरोधामुळे भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना मोजणी न करताच परत जावे लागले. याविषयी माहिती देताना भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्जदार तारक आरोलकर यांनी मोजणीसाठी पैसे भरले होते आणि नियमानुसार आगाऊ नोटीस काढून आम्ही गावात गेलो होतो. मात्र, जमिनीचे अद्याप अधिकृत वाटप झालेले नाही आणि सर्वांना नोटीस मिळालेली नाही, असे म्हणत ग्रामस्थांनी लेखी विरोध दर्शवला. त्यामुळे मोजणी न करताच पथकाला मागे फिरावे लागले.

​शिरशिंगे गावातील या संवेदनशील परिस्थितीवर आता स्थानिक प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.