Sayaji Shinde angry on Government over Cutting Trees in Tapovan : नाशिकमध्ये दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभ मेळा होणार आहे. या कुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या साधूंची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकार नाशिकच्या तपोवनातील १८०० झाडं तोडणार आहे. मात्र, ज्येष्ठ अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदेंसह अनेक सामाजिक संघटना, मराठी कलाकार, लेखक, कवी व नाशिककरांनी या वृक्षतोडीला विरोध केला आहे.

दरम्यान, सयाजी शिंदे यांनी आज (बुधवार, ४ डिसेंबर) दुपारी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं की आपण सर्वजण एकजुटीने लढू व ही झाडं वाचवूया.

“आमच्यासाठी आधी झाडे, मग माणूस!”

सयाजी शिंदे म्हणाले, “सरकार म्हणतंय की आम्ही तपोवनातील झाडं तोडून, इतरत्र नवी झाडं लावू, तसेच यापैकी काही झाडांचं वृक्षपुनर्रोपण करू. मात्र, या सरकारने आजवर त्यांच्या वृक्षपुनर्रोपणांची माहिती दिलेली नाही. किती झाडं लावली? त्यातली किती झाडं वाचली? हे कधीच सांगितलं नाही. झाडं वाचावी आणि जास्तीत जास्त झाडं लागावी अशी आमची इच्छा आहे. आमच्यासाठी आधी झाडे आणि मग माणूस आहे.”

आई-बापावर हल्ला केलात तर गप्प बसाल का? सयाजी शिंदेंचा जनतेला प्रश्न

ज्येष्ठ अभिनेते म्हणाले, “तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी राज्यातले लेखक, कवी, साहित्यिक व सामान्य जनता भूमिका घेत आहे. मला सर्वांना सांगायचं आहे की सर्वांनी जागरुक राहावं, कुठे झाड तोडलं जात असेल तर त्याचा विरोध करावा, झाडं आपल्यासाठी आई-वडिलांसारखी आहेत. आई-बाप आपल्याला जन्म देतात आणि त्यानंतर झाडं आपल्याला जगवतात. त्यांच्यामुळे आपण जगत आहोत. माझा महाराष्ट्रातील सर्व जनतेला प्रश्न आहे की तुमच्या आई-बापावर हल्ला केला तर गप्प बसाल का?

“सरकारने कधी वृक्षपुनर्रोपनाचा हिशेब दिला नाही”

“कुंभ मेळे व्हावेत किंवा होऊ नयेत हा काही माझा प्रश्न नाही. कुंभ मेळे व्हावेत, जत्रा व्हाव्यात, सण साजरे करावेत, आमचा त्याला काही विरोध नाही. त्यामुळे तुम्ही आम्हा आंदोलकांबाबत बोलताना विचार करा. झाडं वाचावीत एवढंच माझं म्हणणं आहे, दुसरं काहीच म्हणणं नाही. वृक्षपुनर्रोपनाच्या नावाखाली विनाकारण खर्च करू नका, लोकांची दिशाभूल करू नका. वृक्षपुनर्रोपनाचा हिशेब आजवर कधी मिळाला नाही. ३३ कोटी झाडांचा हिशेब सरकारने कधी दिला नाही.”

आता झाडं तोडू नका : सयाजी शिंदे

“रस्त्यांलगतची झाडं तोडली. त्याबदल्यात दुसरी झाडं लावू असं सांगितलं होतं, ती झाडं लावली का? कुठे लावली? याबाबत काही सांगितलं नाही. आजवर झालं ते झालं. मात्र आता नवी झाडं तोडू नका. झाडं तुटता कामा नयेत. नवी झाडं लावली तर ती टिकली पाहिजेत.”

सरकारने हैदराबादवरून झाडं आणली, इथं झाडं नाहीत का?

सयाजी शिंदे म्हणाले, “सरकार वृक्षपुनर्रोपणासाठी खणलेले खड्डे दाखवतंय. चार फुटांच्या खड्ड्यात कोणती झाडं लावणार? तिथं लावण्यासाठी हैदराबादवरून झाडं आणली असं सांगितलं आहे. महाराष्ट्रात झाडं तयार होत नाहीत का? इथे इथली पारंपरिक झाडं तयार होत नाहीत का? होत नसतील तर त्याची कारणं काय? इथं झाडं तयार व्हावीत यासाठी सरकार काय करतंय? असे अनेक मुद्दे आहेत.”