बाबासाहेबांच्या साहित्यावरील नवीन खंड मात्र  रखडले

सयाजीराव गायकवाड यांच्यावरील खंडांचे काम वेगाने

सयाजीराव गायकवाड यांच्यावरील खंडांचे काम वेगाने

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जाण्यासाठी आर्थिक मदत करून स्वत:च्या दातृत्वाची साक्ष देणाऱ्या सयाजीराव गायकवाड महाराजांवर येत्या ३१ मार्चपर्यंत १२ खंड प्रकाशित होणार आहेत. मात्र, २००६पासून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावरील एकही खंड शासनाने प्रकाशित केलेला नाही. दोन्ही समित्यांचे अध्यक्ष राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना डॉ. आंबेडकर यांच्या चरित्र साधने समितीच्या कामाला वेग येत नाही, याचे आश्चर्य वाटते.

डॉ. आंबेडकरांचा पत्रव्यवहार आणि छायाचित्रांवरील दोन खंड २००६ नंतर प्रकाशित करण्यात आले. ते वादग्रस्त ठरले. हरी नरके, दत्ता भगत आणि आता अविनाश डोळस अशा आजीमाजी सदस्य सचिवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची धुरा सांभाळली. मात्र, वसंत मून यांच्यानंतर खंड प्रकाशनाच्या कामाला वेग आला नाही. आज त्यांनी प्रकाशित केलेल्या खंडांचेच पुनर्मुद्रण आणि भाषांतरे होतात आणि तेच खंड विक्रीस उपलब्ध केले जातात. शासकीय मुद्रणालयाच्या कार्यालयात किंवा विजयादशमीला दीक्षाभूमीवरील मुद्रणालयाच्या स्टॉलवर प्रचंड गर्दी असते. मात्र, तेच ते खंड उपलब्ध होतात. बाबासाहेबांच्या साहित्यावरील नवीन खंड मात्र वाचायला मिळत नाहीत, अशी खंत वाचकांतर्फे वेळोवेळी व्यक्त करण्यात येते. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्त येत्या १४ एप्रिलला तरी खंड प्रकाशित होईल काय, अशी अपेक्षा वाचकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाकांक्षी प्रकल्प

सयाजीराव गायकवाड यांच्यावरील १० खंडांचे काम वेगाने सुरू आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत १२ खंड प्रकाशित करण्याचा मानस आहे. काही खंडांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २८ ऑक्टोबर २०१६ला उच्च शिक्षण मंत्र्यांबरोबर बैठक झाली आणि लगेच कामे सुरू केली. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून महाराजांवर खंड प्रकाशित करायला मिळणे हे मोठे काम आहे.  बाबा भांड, सचिव, महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समिती

सापत्न वागणूक का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी तब्बल ४० वर्षांपूर्वी समिती स्थापन केली. मात्र, साहित्य प्रकाशित होत नसल्याने भारतीय दलित पँथर सोबत पाठपुरावा केला. त्यातून सदस्य सचिव बदलले. मात्र, समितीचे काम पुढे गेले नाही. एक पत्रव्यवहाराचा खंड आणि दुसरा बाबासाहेबांच्या छायाचित्रांवरील खंड एवढीच गेल्या दहा वषार्ंतील समितीची कामगिरी आहे. दरवर्षी एकतरी खंड प्रकाशित झाला पाहिजे, अशी अट असताना २०१०नंतर एकही खंड नाही. सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी आदर आहे. त्यांच्यावरील खंडाने बौद्धिक मेजवानी मिळेलच. पण बाबासाहेबांना नेहमीच सापत्न वागणूक का?   प्रकाश बन्सोड, अध्यक्ष, भारतीय दलित पँथर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sayajirao gaekwad dr babasaheb ambedkar

ताज्या बातम्या