स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत देशाच्या जडणघडणीत पंडित नेहरु यांचे योगदान तरुण पिढीला माहिती व्हावे याउद्देशाने प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांचे ‘नेहरु: कल आज और कल’ हे व्याख्यान टिळक भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली. भारत माता कोण आहे? हे ज्यांना माहित नाही तेच लोक ‘भारत माता की जय’ म्हणत त्याच भारतमातेला विकत आहेत, असा आरोप पटोले यांनी भाजपावर केला केला. 

यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनीक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आमदार प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ माजी मंत्री सुरेश शेट्टी, उल्हासदादा पवार, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे आदी होते.

नाना पटोले म्हणाले, “भारत माता कोण आहे? हे ज्यांना माहित नाही तेच लोक ‘भारत माता की जय’ म्हणत त्याच भारतमातेला विकत आहेत. अगरवाल यांनी पंडित नेहरु यांच्या विचाराचा व भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान किती मोलाचे आहे हे अत्यंत साध्या व सोप्या भाषेत पटवून दिले. असे कार्यक्रम राज्यभर राबवून नवीन पिढीला पंडित नेहरु यांच्याबद्दलची माहिती व्हावी यासाठी राबविले जातील. असे कार्यक्रम राबविले तर नेहरु यांच्याबद्दल जो अपप्रचार सुरु आहे तो खोटा असून वस्तुस्थिती समजेल.”

यावेळी बोलताना मुकुल वासनिक म्हणाले की, “नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा, उत्साह संचारलेला दिसत आहे. ते धडाडीचा नेते असून काँग्रेस संघटन कसे मजबूत करता येईल यावर त्यांचा विशेष भर दिसत आहे. महाराष्ट्र ही संताची, वीरांची भूमी आहे. शिवाजी महाराजांची भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. ‘चले जाव’चा आवाज उठला ती भूमी आहे, याच भूमितून ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हा आवाज उठला होता.”

२०१४ च्या निवडणुकीत थापा मारून सत्ता मिळवली

२०१४ च्या निवडणुकीत थापा मारून ज्यांनी सत्ता मिळवली तो नेता नाही तर अभिनेता निघाला, नायक नाही तर खलनायक निघाला अशी टीका त्यांनी मोदींचे नाव न घेता केली.

देशातील काही लोकांना पंडित नेहरु हा मोठा अडथळा वाटत आहेत. परंतु जवाहरलाल नेहरुंचे विचार भारतात जोपर्यंत जिवंत राहतील तोपर्यंत भारतीय राज्यघटना, लोकशाही अबाधित राहील. आज देशावर संकट आहे, लोकशाहीवर, राज्यघटनेवर संकट आहे. ही परिस्थिती समजून काँग्रेसची विचारधारा, काँग्रेसचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान याची माहिती लोकांपर्यंत पोहचवा असे आवाहनही वासनिक यांनी केले.

काय म्हणाले अगरवाल? 

महात्मा गांधी यांनी पंडित नेहरु यांना देशाचा नेता म्हणून निवडले हे योग्यच होतं हे सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर एका वर्षातच स्पष्ट केले. मात्र काहीजण नेहरू आणि पटेल यांच्यात वाद होता असे खोटे सांगून संभ्रम निर्माण करतात. पंडित जवाहरलाल नेहरु हे त्यावेळच्या नेत्यांच्या सर्वात पुढचा विचार करणारे नेते होते, ते दूरदृष्टी असणारे नेते होते. पंडित नेहरु इतिहासात महत्वपूर्ण होते, वर्तमानात महत्वपूर्ण आहेत आणि भविष्यातही महत्वपूर्ण राहतील, असे प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांनी म्हटले आहे.