मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका माणसावर POSCO अंतर्गत दाखल केलेला खटला रद्द केला आहे. I Love You म्हणणं हे भावना व्यक्त करणं आहे. यामुळे कुठल्याही प्रकारचं लैंगिक शोषण होत नाही असं मुंबई उच्च न्यायलयाने म्हटलं आहे. उर्मिला जोशी-फाळके यांच्या एकल पीठाने हा निर्णय दिला आहे. ३५ वर्षांच्या एका आरोपीला लैंगिक शोषणाच्या आरोपांतून मुक्त केलं आहे.
उर्मिला जोशी-फाळके यांनी काय म्हटलं आहे?
न्यायालयाच्या सुनावणीदरम्यानच्या ऑर्डरमध्ये न्यायालयाने असं म्हटलं आहे की एखाद्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, तिला निर्वस्त्र करणे, तिला पाहून अश्लील इशारे करणे, अश्लील वर्तन करणे या सगळ्याने महिलेचा विनयभंग होतो. दरम्यान पॉक्सो चा खटला दाखल करण्यात आलेल्या एका माणसाला न्यायलायने मुक्त केलं आहे.
नेमकी काय घटना घडली?
एका सतरा वर्षांच्या मुलीला ती शाळेतून घरी जात असताना या माणसाने अडवलं, तिचा हात धरला आणि तो तिला आय लव्ह यू म्हणाला. यानंतर अल्पवयीन मुलगी घरी आली, तिने तिच्या वडिलांना ही बाब सांगितली ज्यानंतर मुलीच्या वडिलाने तक्रार दाखल केली. न्यायालयाने या गुन्ह्यातून सदर माणसाला मुक्त करताना हे म्हटलं आहे की सदर माणसाने त्या मुलीशी कुठलंही अश्लील वर्तन केल्याचा परिस्थितीजन्य पुरावा उपलब्ध नाही. न्यायालयाने हेदेखील म्हटलं आहे की आय लव्ह यू हे म्हणणं म्हणजे भावना व्यक्त करणं आहे. त्यामुळे त्याने तिच्याशी काही अश्लील वर्तन केलं किंवा तिचा विनयभंग केला असं म्हणता येणार नाही. सदर माणसाच्या आय लव्ह यू म्हणण्यामागे आणखी काही हेतूही दिसला नाही. त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला नाही किंवा तसे काही इशारेही केले नाहीत असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. हे प्रकरण लैंगिक शोषणात मोडत नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
खंडपीठाने काय निरीक्षण नोंदवलं?
एखाद्या व्यक्तीने एखद्या मुलीला आय लव्ह यू म्हणणं हे त्याच्या भावनांचं प्रदर्शन आहे. यामुळे त्याने मुलीचा विनयभंग केला किंवा त्याने तिचा लैंगिक छळ केला असं म्हणता येणार नाही असंही निरीक्षण न्यायलायने नोंदवलं आहे.