scorecardresearch

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणखी आठवडाभर बंदच!

पालकमंत्री मुश्रीफ आज नगरमध्ये होते. त्यांच्या उपस्थितीत करोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

जिल्हा प्रशासन ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

नगर : करोना संसर्ग वाढलेला असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय किमान आठवडाभर तरी सुरू केले जाणार नाहीत, त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, याबाबत जिल्हा प्रशासन ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे, असे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, मंगळवारी आढावा बैठकीनंतर बोलताना स्पष्ट केले.  पालकमंत्री मुश्रीफ आज नगरमध्ये होते. त्यांच्या उपस्थितीत करोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.   

मुश्रीफ म्हणाले, लगतच्या पुणे व नाशिक जिल्ह्यात संसर्ग वाढलेला असल्यामुळे तेथील शाळा बंद आहेत. नगर जिल्ह्याचा या दोन्ही जिल्ह्यांशी मोठा संपर्क असतो. तेथील शाळाही बंद आहेत. राज्यात काही ठिकाणी संसर्ग वाढल्यामुळे सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत घाई केली जाणार नाही वाट पाहून निर्णय घेतला जाईल. तिसरी लाट सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात गेल्या १० दिवसांत १३ हजार २४९  बाधित आढळले. गेल्या डिसेंबरमध्ये दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी म्हणजे १ हजार ६७५ बाधित आढळले होते. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये १७ हजार ३३० बाधित आढळले आहेत, १३ जणांचा मृत्यू झाला. तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या १ हजार ७५१ रुग्ण दाखल आहेत तर ७ हजार ६०० रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. बहुतांशी रुग्णांना सौम्य लक्षण आहेत. त्यामुळे प्राणवायू, आयसीयू, व्हेंटिलेशन लागण्याचे प्रमाण कमी आहे. 

करोना प्रतिबंधासाठी १९ कोटींचा निधी

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत नगर जिल्ह्याला १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधून जिल्हा रुग्णालयात. ६० खाटांचा आयसीयू कक्ष, घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात २० खाटांचा कक्ष, नगरमध्ये लहान मुलांसाठी ४२ खाटांचा कक्ष तसेच प्रत्येक रुग्णवाहिकेस इंधनासाठी ६० हजार रुपये उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली. 

करोनाबळींच्या वारसांच्या खात्यावर ३३ कोटी वर्ग

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या वारसाला प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. करोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार १७० जणांचा मृत्यू झाला, मात्र जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी ७ हजार ६५० प्रकरणे दाखल झाली आहेत. छाननी करून त्यातील ६ हजार ६३९ प्रकरणांना मान्यता देण्यात आली. त्यामध्ये ३३ कोटी १९ लाख रुपयांचा निधी संबंधितांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Schools colleges district closed week ysh

ताज्या बातम्या