“कोकणातील उन्मळून पडलेल्या फळ झाडांचे शास्त्रोक्त पुनर्जीवन करा”

भाजपा नेते आशिष शेलार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

कोकणपट्टीवर व सह्याद्री नजीकच्या पट्ट्यामध्ये फळ बागांना विशेषतः आंबा नारळ केळी आदी वृक्षांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. हजारो झाडे उन्मळून पडलेली आहेत. त्यामुळे शेकडो बागायतदारांचे अतोनात नुकसान झालेले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या सर्व शेतकऱ्यांना तत्काळ मदत करून उन्मळून पडलेली झाडे त्याच ठिकाणी शास्त्रोक्त प्रयत्नाने उभी करण्याबाबत शासनाने विशेष प्रयत्न करावेत, याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधले आहे.

आशिष शेलार यांनी याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “गेली दोन दशके मुंबईतच नव्हे तर जगभरच्या वृक्ष लागवडीच्या व त्यानंतर घडणाऱ्या वादळाच्या नुकसान दुरुस्तीची एक पद्धत उपलब्ध आहे. त्या तंत्रज्ञानाद्वारे उन्मळून पडलेल्या झाडांची मुळे स्वच्छ करून व झाडांची तुटलेल्या फांद्या आणि पाने यांची योग्य ती छाटणी करून ती झाडे पुन्हा उभी करता येतात. त्यासाठी दाभोळकर तंत्रज्ञानच्या मदतीने ४ x ४ फूट अथवा जेवढी झाडांच्या मुळांची खोली उपलब्ध असेल त्या खोलीचा खड्डा खोदून, त्यातील पाणी काढून त्यात डी ऑईल्ड निमकेक चांगली लाल माती, आणि त्या भागात असलेल्या वनराईची वाळलेली पाने आणि काटक्या त्याचे स्तर रचून एका सपोर्टच्या मदतीने झाड उभे करण्यात येते. त्यानंतर त्याला दर आठवड्याला तीन ते पाच लिटर अथवा झाडाच्या बुंध्याचा अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी देण्यात येते. हे दिल्यानंतर झाडाची मुळे विशेषतः आंब्याची मुळे आपोआप जमिनीत रुजतात व पहिल्या वर्षीच पाने यायला सुरुवात होतात आणि दोन ते तीन वर्ष्यात उत्पादन सुरू होते. म्हणजे पाच वर्ष्याच्या आत त्याच्या पूर्व क्षमतेच्या ५०% अंदाजे उत्पादन होऊ शकते आणि दरवर्षी उत्पादन वाढत जाते. हे तंत्रज्ञान वापरताना कृषी विद्यापीठतील व मुंबई महानगर पालिकेतील उद्यान विभागाच्या तज्ञांना प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक दाखवावे लागेल आणि त्यानंतर त्याला आवश्यक असलेले फोर्स लिफ्टस आणि क्रेन या तातडीने तिथे हलवून ते काम तीन ते सात दिवसात वादळ थांबल्यानंतर सुरू करणे आवश्यक आहे. याद्वारे आंबा, नारळ, काजू व इत्यादी अनेक फळ झाडांना आपण पुनर्जीवित करू शकू.”

तसेच, “आज या प्रत्येक झाडाचा उभं करण्याचा खर्चाचा अंदाज देणं कठीण आहे पण अवघ्या तीन ते पाच हजार रुपयात जे झाड शेतकऱ्यांना पुन्हा फळ देणारे ठरेल. तसेच हे काम शेतकऱ्यांना मानसिकदृष्टया शक्ती देण्यासारखे ठरेल. म्हणून यासाठी तात्काळ टास्क फोर्स निर्माण करण्यात यावी. ज्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठ, मुंबईतील खाजगी संस्था ज्या या काम करतात आणि मुंबई महानगरपालिका या संस्थांचा हा गट तयार झाला आणि जागोजाग जर त्यांनी प्रात्यक्षिक केली तर १५ दिवसामध्ये नवीन उत्साहमध्ये शेतकरी कामाला लागेल.” त्यामुळे तज्ज्ञ समितीची स्थापना करून या कार्यास तीन दिवसांच्या आत मार्गी लावावे अशी विनंती, देखील आशिष शेलार यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Scientifically revive uprooted fruit trees in konkan shelar msr

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या