खान्देशात कापसाला हंगामातील उच्चांकी भाव

कापूस खरेदीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधील खरेदीदारांचे दलाल खान्देशात दाखल झाले आहेत.

अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट

जळगाव : या वर्षी कपाशीची लागवड आधीच कमी असताना त्यात अतिवृष्टीमुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनही कमी आले आहे. यामुळे कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता वास्तवात येण्याच्या मार्गावर आहे. सध्या हंगामातील सर्वाधिक म्हणजे साडेआठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दरात कापसाची थेट खरेदी होत आहे. पुढील काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

खान्देशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची चाके १०-१५ दिवसांत वेगाने फिरू लागली आहेत. यामुळे कापसाची थेट (खेडा) खरेदीही सुरू झाली आहे. ग्रामीण भागात कापूसवेचणी वेगात सुरू असल्याने मजुरांचा तुटवडा भासत आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला कापसाचे दर पाच हजार २०० रुपये, महिनाअखेर सहा हजार २०० रुपये झाले होते. ऑक्टोबरमध्ये दरात वाढ होऊन ते साडेसात हजारांवर पोहोचले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा आदी भागांत कापसाची आठ हजार २५० रुपये प्रतिक्विंटलने थेट खरेदी झाली. हा या हंगामातील कापसाला थेट खरेदीत मिळालेला उच्चांकी दर आहे. सद्य:स्थितीत कापसाचे दर नऊ हजारांवर पोहोचले आहेत.

कापूस खरेदीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधील खरेदीदारांचे दलाल खान्देशात दाखल झाले आहेत. अंकलेश्वार-बऱ्हाणपूर महामार्गालगत म्हणजेच तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल भागांत कापसाला भाव अधिक मिळत आहे, कारण या भागातून मध्य प्रदेश, गुजरातमध्ये लवकर पोहोचणे शक्य आहे. अनेक शेतकरी दरवाढीच्या अपेक्षेने सध्या कापूसविक्री टाळत आहेत, कारण उत्पादन कमी आले आहे. खर्च अधिक आहे. नुकसान भरून निघण्यासाठी नफा अपेक्षित आहे.

बागायत कापूस पावसात सापडल्याने वजनाला जड भरत होता, तर थंडी पडत असल्यानेही कापूस वेचणीनंतर वजन जड भरते. कापसाचे दर पुढील काळात प्रतिक्विंटल १० ते ११ हजारांपर्यंत जाण्याची अपेक्षा शेतकरी वर्गात आहे. घरात दाबून ठेवलेल्या कापसाच्या वजनात घट होण्याची शक्यता अधिक असते.

खान्देशातील कापूस काही प्रमाणात गुजरात, मध्य प्रदेशात जात आहे. गुजरातमधील तळी, अहमदाबाद, सुरेंद्रनगर, विजापूर, हिंमतनगर तसेच मध्य प्रदेशातील सेंधवा, खरगोन आदी भागांत हा कापूस जातो. शिवाय, जळगाव जिल्ह्यातील चोपडा, धरणगाव येथील जिनिंगमध्ये कापूस पाठविला जातो. सध्या कापूसवेचणी वेगात सुरू आहे. कापसाच्या भावात चढ-उतार होत आहेत. आगामी काळात कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे. – नरेंद्र धनगर (कापूस व्यापारी, कमखेडा, धुळे)

ग्रामीण भागात सध्या कापूसवेचणी वेगात आहे. शेतमजूर मिळणेही दुरापास्त झाले आहे. यंदा अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले. उत्पादनही कमी प्रमाणात झाले. शेतकरी अडचणीत असून दर आणखी वाढवून देण्याची गरज आहे. – भूषण पवार (शेतकरी, हुंबर्डे, धुळे)

कापूसवेचणीसाठी शेतमजूर मिळणेही कठीण झाले आहे. जामनेर तालुक्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. कपाशी पिकावर झालेला खर्च निघणेही अवघड आहे. – सुनील महाजन (शेतकरी, जामनेर, जळगाव)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Seasonal high prices of cotton in khandesh akp

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे