जळगावमध्ये सध्या राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज (२० ऑक्टोबर) पाचोऱ्यात केलेल्या गुप्त दौऱ्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी केवळ एक आमदार आणि एका मंत्र्याला याबाबत माहिती देत अत्यंत गुप्तपणे जळगावला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी पाचोरा व भडगाव नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. तसेच आमादर किशोर आप्पा पाटील यांच्याकडून आगामी पालिकेच्या राजकारणाची माहिती जाणून घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दौऱ्याविषयी माहिती देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “हा एकनाथ शिंदे यांचा खासगी दौरा होता. त्यांनी देवाकडे नवस केला होतो. त्यामुळे त्यांनी दर्शन घेतलं आणि ते २ तासात पुन्हा रवाना झाले. आमची त्यांच्याशी भेट झाली. त्यांच्यासोबत आमदार किशोर आप्पा पाटील होते. या भेटीत महापालिकेतील कामांविषयी चर्चा झाली.”

जळगावला २० कोटी रुपयांचा निधी देण्याचं आश्वासन

“एकनाथ शिंदे यांनी जळगावला नगरउत्थानमध्ये २० कोटी रुपयांचा निधी देण्याचं आश्वासन दिलंय. तसेच पुढील काळात नगरपालिकेला जी मदत लागेल ती करण्याचंही आश्वासन दिलं. त्यामुळे पुढील काळात जळगावची अपूर्ण राहिलेली कामं, रस्त्यांचा प्रश्न तो महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांच्या माध्यमातून पुढील काळात निश्चितपणे सुटेल,” अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.

आगामी नगरपालिकेच्या निवडणकांचे रणशिंग फुंकल्याची जोरदार चर्चा

जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी रणनीतीबाबत जळगावातील पदाधिकाऱ्यांशी गुप्त चर्चा केली. त्यांनी शहरातील कृष्णापुरी भागातील प्रभू रामचंद्र यांच्या साक्षीने आगामी नगरपालिका निवडणुकांचे जणू रणशिंगच फुंकल्याची शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे. या दौऱ्याबाबत अंत्यत गुप्तता पाळल्याने याची माहिती प्रमुख कार्यकर्त्यांसह माध्यम प्रतिनिधींना देखील नव्हती. त्यामुळे या भेटीची पाचोरा शहरासह जिल्ह्यात वेगवेगळी चर्चा रंगली होती.

मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंवर काही तालुक्यांची विशेष जबाबदारी?

दरम्यान पाचोरा शहरातील प्रभू रामचंद्र मंदिर परिसरात झालेल्या या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासह केवळ आमदार किशोर आप्पा पाटील, मुकूंद अण्णा बिलदीकर आणि नगराध्यक्ष संजय गोहिल हे चारच जण उपस्थित होते. याबैठकीत अनेक खलबतं झाल्याची माहिती आहे. पालिकेअंतर्गत नगरविकास विभागाकडे प्रस्तावित असलेल्या कामांची त्यांनी माहिती घेतली. तसेच तात्काळ सर्व विषय मार्गी लावणार असल्याचे नियोजन केले.

हेही वाचा : “… त्यामुळे नारायण राणेंचं डोकंही सूक्ष्म झालेलं आहे”; गुलाबराव पाटलांची गंभीर टीका!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तेथे करावयाच्या नियोजनाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवल्याने त्यांनी अशा प्रकारे गुप्त दौऱ्यांची सुरुवात पाचोऱ्यातून केल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्ष व राज्य सरकार पूर्णपणे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीशी आहे. त्यांना यानिमित्ताने बळ मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदेंकडून बंददाराआड चर्चा

दरम्यान या भेटीवेळी राममंदिर परिसरात नामदार एकनाथ शिंदे, आमदार किशोर आप्पा पाटील व मुकुंद बिल्डीकर या तिघांमध्ये बंददाराआड चर्चा झाली. या चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी यात विविध राजकीय विषयांवर खलबते झाल्याची माहिती आहे. पालिका निवडणुकांची रणनीती आखली गेल्याची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Secret jalgaon visit by minister eknath shinde know what happens pbs
First published on: 20-10-2021 at 13:09 IST