अकोला जिल्ह्यातील पातूर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका सुरक्षा रक्षकानं थेट महाविद्यालयाच्या बागेत गांजाची शेती फुलवली आहे. आरोपी सुरक्षा रक्षक महाविद्यालयातूनच गांजाची अवैधरित्या विक्री करत होता. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पातूर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापेमारी केली. यावेळी पोलिसांना गांजाची एकूण १४२ झाडं आढळून आली आहेत. याची बाजारातील किंमत तब्बल ४ लाख इतकी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
प्रकाश सुखदेव सौंदळे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो पातूर येथील ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. तो मागील बऱ्याच दिवसांपासून महाविद्यालय प्रशासनाच्या नाकाखाली हा अवैध धंदा करत होता. त्यानं महाविद्यालयाच्या बागेतच गांजाची शेती फुलवली होती. त्यालाही गांजाचं व्यसन होतं. तसेच महाविद्यालयाच्या आवारातूनच तो गांजाची अवैध विक्री करत होता.
याबाबतची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर पाळत ठेवून संबंधित ठिकाणी छापेमारी केली आहे. याठिकाणी पोलिसांना १४२ गांजाची झाडं आढळून आली आहेत. पोलिसांनी सर्व झाडं जप्त केली असून याची बाजारातील किंमत जवळपास ४ लाख रुपये इतकी आहे. संबंधित धक्कादायक प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पातूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.