Maharashtra Deputy CM and NCP Leader Ajit Pawar Last Rites Updates : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं असून आज २९ जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जय पवार आणि पार्थ पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आणि आपला माणूस, आपला दादा सोडून गेल्याचं दुःख जाणवत होतं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. अजातशत्रू असलेल्या अजित पवारांना पाहण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते विद्याप्रतिष्ठाण येथे जमले होते. दरम्यान, यावेळी त्यांची सतत साथसोबत करणारे आणि त्यांची सतत सुरक्षा करणारे सुरक्षा रक्षकही आज रडताना दिसले.
अजित पवाराच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी पार्थिवाला अग्नी दिला. त्यानंतर हजारो उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. ‘‘महाराष्ट्राची शान, पुणे जिल्ह्याचा अभिमान, बारामतीचा आत्मा… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार अमर रहे… शेतकरी, कष्टकरी, बहुजनांचे कैवारी अजित दादा अमर रहे, अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. दादा, दादाचा हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त करण्यात आला.
अजित पवारांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर चितेजवळच त्यांच्या सुरक्षा रक्षकांना भावना अनावर झाल्या. तिथेच सुरक्षा रक्षक धाय मोकलून रडू लागले. त्यामुळे बाजूला असलेल्या जय पवारांनी त्यांना मिठीत घेतलं आणि त्यांचं सांत्वन केलं. अजित पवारांच्या जाण्याने अबालवृद्धांना दुःख झालं आहे. त्यांच्याबरोबर एक क्षणही व्यतित केलाल माणूस त्यांच्याविषय़ी भरभरून बोलतोय. त्यामुळे त्यांच्यासोबत सतत असणारे त्यांचे सुरक्षा रक्षकही आज हवालदिल झाले. त्यामुळे आपल्या दादाला अनंतात विलीन होताना पाहताना त्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला असेल.
दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ आणि जय पवार यांच्याही भावना अनावर झाल्या होत्या. पण जबाबदारीचं भान ठेवून त्यांना वावरावं लागलं. अंत्यसंस्काराची तयारी करण्यापासून आलेल्या प्रत्येकाचं सांत्वन स्वीकारण्यापर्यंत सर्वकाही त्यांनी नेटाने सांभाळलं. त्यामुळे आपल्या वडिलांच्या सुरक्षा रक्षकांनाही त्यांनीच आधार दिला.

