अहिल्यानगर : धर्मात केवळ स्वार्थ पाहणारे आणि धर्माची चेष्टा करणारे दोघेही राजकारणाचा स्तर खाली जाण्यास कारणीभूत आहेत. दोघांनाही धर्म कळालेलाच नाही. धर्म आणि राजकारण यांचे संबंध समजून घेण्यासाठी सेनापती बापटांचे जीवन मोठे उपयुक्त आहे, असे प्रतिपादन कवी व संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव यांनी येथील साहित्य संमेलनात बोलताना केले.
राज्य सरकारचे ‘साहित्य व संस्कृती मंडळ’ आणि ‘आत्मनिर्धार फाउंडेशन’ यांनी आयोजित केलेल्या स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कवी इंद्रजित भालेराव बोलत होते. कल्याण रस्त्यावर उभारण्यात आलेल्या ‘दया पवार साहित्य नगरीत’ हे दोन दिवसीय साहित्य संमेलन होत आहे. त्याचे उद्घाटन आज, शनिवारी प्राचार्य माहेश्वरी गावित यांच्या हस्ते, स्वागताध्यक्ष सचिन जाधव, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. बी. जी. शेखर, राजेश गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रा. भानुदास बेरड, डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी, सचिन चोभे, सिद्धनाथ मेटे महाराज, रामदास कोतकर आदी उपस्थित होते.
इंद्रजित भालेराव यांनी स्वरचित व सेनापती बापट यांच्या विविध कविता सादर केल्या. ते म्हणाले, सध्याच्या काळात आपल्याला इतिहास आणि महापुरुषांच्या विचाराचे स्मरण करून धोरण ठरवावे लागेल. महाराष्ट्र हा राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आहे. त्यासह सेनापती बापट यांच्यासारख्या मंडळींनीही वैचारिक गुंफण कायम ठेवली आहे. त्याचा विसर महाराष्ट्रासह देशाला पडला आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होणारा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. सेनापती बापटांच्या काळातील एकूणच धुरिणांच्या जीवनाचा व विचारांचा आधार धर्मच होता. धर्मात आधी नसलेली देशभक्ती व समाजसेवा या धुरिणांनी धर्माच्या कक्षेत आणली. स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणातून हळूहळू धर्म हे अधिष्ठान मागे पडत गेले आणि आज धर्म हे विकृत रूपात राजकारणाचे अधिष्ठान बनले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लोकांनी आधी धर्माचा सखोल अभ्यास केला, त्यानुसार आचरण केले आणि मग त्याचे उपयोजन राजकारणासाठी केले. आज केवळ मतांसाठी राजकारणाला धर्माचा आधार दिला जात आहे. स्वातंत्र्यपूर्वीच्या राजकारणात खऱ्या अर्थाने धर्म व आणि कर्मयोगी पुरुषच राजकारणाचे धुरीण होते. आज धर्माचा स्पर्शही नको म्हणणारे राजकारणी आणि धर्माला बीभत्स स्पर्श करणारे राजकारणी, दोघेही राजकारणाच्या अधोगतीला व गुन्हेगारीकरणाला सारखेच जबाबदार आहेत. एकाने धर्म कोसो दूर ठेवला, त्याचा फायदा घेऊन दुसऱ्याने धर्म बगलेत मारला. आज दोन्ही बाजूने धर्माची जी अवहेलना सुरू आहे, तेच इथल्या राजकारणाचा स्तर खाली जाण्यास कारण आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामध्ये ग्रंथ फेरीस सुरुवात झाली. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक जवाहर मुथा यांच्या हस्ते दिवंगत साहित्यिक संतोष शिंदे ग्रंथ दालनाचे उद्घाटन करण्यात आले. दिवंगत साहित्यिक मुबारक तांबोळी विचारमंचचे उद्घाटन राजेंद्र फड यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड व नंदेश शिंदे यांनी केले.
